वाळवणीचे पदार्थ बनविण्याची लगबग
By Admin | Published: March 3, 2017 12:55 AM2017-03-03T00:55:40+5:302017-03-03T00:55:52+5:30
खामखेडा : गेल्या आठ-दहा दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने महिला वाळवणीचे पदार्थ बनविण्याची लगबग सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.
खामखेडा : गेल्या आठ-दहा दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने महिला वाळवणीचे पदार्थ बनविण्याची लगबग सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.
दरवर्षी साधारण फेब्रुवारी महिन्यानंतर म्हणजे मार्च महिन्यापासून महिलावर्ग वाळवणीचे पदार्थ तयार करतात. आता लग्नसराईचा हंगामही सुरू झाला आहे. ज्या घरी लग्न म्हटले की तेथे हे वाळवणीचे पदार्थ तयार करावे लागतात. म्हणजे यात वडे, पापड, कुरडई, शेवया, बटाटे चकली, मसाले आदि कामे मार्च महिन्यात करतात. मार्च महिन्यात कडक उन्हाळा असतो. या उन्हामध्ये वाळवणीचे पदार्थ लवकर वाळतात. परंतु चालू वर्षी मार्च महिन्यामध्ये सतत ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे कडक ऊन न पडल्यामुळे वाळवणीचे पदार्थ बनविण्यास उशीर झाला आहे.पूर्वी वाळवणीचे पदार्थ बनविण्यासाठी ग्रामीण भागामध्ये अत्याधुनिक साधने नव्हती, त्यामुळे सात-आठ महिला ग्रुप तयार करून एकमेकींचे पदार्थ बनवित असत. पूर्वी वड्याच्या डाळी घट्यावर दळल्या जात असे, परंतु आता वड्याच्या डाळी दळण्यासाठी विजेवर चालणाऱ्या चक्क्या आल्या. त्यावेळेस पिठाच्या गिरणीतून उडीद किंवा नागलीचे दळून आल्यावर महिला घरीच पापड लाटत असत. एका घरचे पापड तयार करण्यासाठी पाच महिलांना दोन दिवस लागत असे. परंतु आता पापड बनविणारे मशीन आले. आता अवघ्या एक तासात पापड तयार होतात. कुरडयाचे ओले गहू दळण्याचे यंत्र आले, त्यामुळे आता पूर्वीसारखा जास्त वेळ लागत नाही. आता पूर्वीसारखे जास्त दिवस लागत नाही. एप्रिल महिना लागल्यापासून आकाशातील वातावरण स्वच्छ होऊन उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. वडे, पापड, कुरडया आदि पदार्थ बनविण्यासाठी अनुकूल वातावरण तयार असल्याने महिला वडे, पापड, कुरडया, बटाटा चकली, साबुदाणा चकली, नागलीचे पापड आदि पदार्थ बनविण्यात व्यस्त आहेत. काही वेळेस त्यांना पुरु षांनाही मदत करावी लागते.
आता महिला बचतगट वडे, पापड, कुरडया, मसाले, शेवया आदि आॅर्डर घेऊन हे सर्व पदार्थ घरी पोहोच करतात. त्यामुळे महिलांना रोजगार मिळतो.
आता बाजारात सर्व तयार पदार्थ मिळू लागल्याने तयार घेण्याकडे अनेकांचा कल दिसून येत आहे. परंतु अजून ग्रामीण भागात मात्र वाळवणीचे पदार्थ घरीच तयार करतात. (वार्ताहर)