तळीरामांवर ‘खाकी’ची करडी नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 12:19 AM2017-07-23T00:19:14+5:302017-07-23T00:19:28+5:30
नाशिक : गटारी अमावास्या अर्थात आषाढ महिनाच्या शेवटचा दिवस आणि त्यात रविवार असल्यामुळे तळीरामांनी विविध हॉटेलांमध्ये पार्ट्यांचे नियोजन केले आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : गटारी अमावास्या अर्थात आषाढ महिनाच्या शेवटचा दिवस आणि त्यात रविवार असल्यामुळे तळीरामांनी विविध हॉटेलांमध्ये पार्ट्यांचे नियोजन केले आहे़ पार्ट्यांमध्ये दारू पिऊन धिंगाणा घालणे, मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावरून गोंधळ घालीत वेगात वाहने पळविणाऱ्या या तळीरामांवर पोलिसांची करडी नजर राहणार असल्याने त्यांना ‘झिंग झिंग झिंगाट’ होणे चांगलेच महागात पडणार आहे़ तळीरामांच्या बंदोबस्तासाठी शहरातील विविध चौकांमध्ये वाहतूक तसेच साध्या वेशातील पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला जाणार असून, ड्रंक अॅण्ड ड्राइव्हबरोबरच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी दिली आहे़ यंदा आषाढ अमावास्या अर्थात गटारीला शनिवारी (दि़२२) सायंकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास प्रारंभ होऊन रविवारी (दि़२३) रात्री सव्वातीन वाजेपर्यंत अमावास्या असणार आहे़ त्यानंतर श्रावण महिन्यास सुरुवात होणार असून, या महिन्यात मद्य व मांसाहार व्यर्ज केला जातो़ त्यामुळे गटारी अमावास्येला मद्य व मांसाहार मोठ्या प्रमाणात करण्याची प्रथाच पडली आहे़ या दिवशी मद्यप्राशन करून रस्त्यावरील अपघात तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच तळीरामांवर अंकुश ठेवण्यासाठी शहर व ग्रामीणमध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे़ शहर पोलिसांकडून रविवारी शहरात दाखल होणारे त्र्यंबकरोड, आडगावरोड, दिंडोरीरोड, पेठ रोड, मुंबई-आग्रा महामार्ग तसेच शहरातील प्रमुख ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जाणार आहे़ विनापरवाना मद्यविक्री करणारे हॉटेल्स, ढाबे यांच्याबरोबरच विनापरवाना मद्यप्राशन करणारे तळीराम, वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाणार आहे़ ड्रंक अॅण्ड ड्राइव्हच्या तपासणीसाठी वाहतूक पोलिसांसाठी २० ब्रेथ अॅनालायझरची व्यवस्था करण्यात आली असून, शहरातील चार युनिटला १५ ब्रेथ अॅनालायझरचे वाटप करण्यात आले आहे, तर पाच ब्रेथ अॅनालायझर हे इमर्जन्सीसाठी ठेवण्यात आले आहेत़
‘आॅन द स्पॉट’ होणार गुन्हा दाखल
वाहतूक पोलिसांकडे आधुनिक ब्रेथ अॅनालायझर असून, याद्वारे मद्यपी वाहनचालकांची जागेवरच माहिती संकलित करून लागलीच गुन्हा दाखल केला जाणार आहे़ यापूर्वी साध्या ब्रेथ अॅनालायझरच्या माध्यमातून मद्यपी वाहनचालकांची तपासणी करून त्यांना जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविले जायचे.
वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अहवाल प्राप्त झाला आणि त्यात ३० मिली ग्रॅमपेक्षा जास्त अल्कोहोल संशयितांनी घेतल्याचे निष्पन्न झाले तरच गुन्हा दाखल करून मद्यपी वाहनचालकास कोर्टासमोर केले जात होते. मात्र आधुनिक ब्रेथ अॅनालायझरमुळे मद्यपी वाहनचालकाची माहिती, त्याचा वाहन क्रमांक, लायसन्स क्रमांक, फोटो तसेच अल्कोहोलचे प्रमाण, कारवाई केलेल्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्याची माहिती रिपोर्टमध्ये येते. या रिपोर्टची जागेवरच प्रिंट काढून त्यावर मद्यपी वाहनचालकाची स्वाक्षरी घेण्यात येते व हाच रिपोर्ट वैद्यकीय पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो़