नवनिर्माण पहा आणि कौतुकाची फुले वाहा !
By admin | Published: January 17, 2017 12:09 AM2017-01-17T00:09:00+5:302017-01-17T00:09:19+5:30
मनसेचे इलेक्शन टूरिझम : मराठी तारे-तारकांचे आज नाशिक दर्शन
नाशिक : ‘मला पहा आणि फुलं वाहा’ असे म्हटले जाते. त्याचा प्रत्यय मंगळवारी (दि. १७) नाशिकमध्ये मनसेकडून राबविल्या जाणाऱ्या इलेक्शन टूरिझमच्या माध्यमातून येणार आहे. महापालिकेतील पाच वर्षांच्या सत्ताकाळात मनसेने शहरात केलेले नवनिर्माण पाहण्यासाठी ठाणेकरांनंतर आता सुमारे चार डझन मराठी तारे - तारका मंगळवारी नाशकात येत आहेत. दिवसभर विविध प्रकल्प पाहून तारे-तारका मनसेवर कौतुकाची फुले उधळतील आणि पक्षाच्या प्रचाराचाही नारळ फुटेल.
मनसेने सत्ताकाळात नाशिक फर्स्टमार्फत ट्रॅफिक चिल्ड्रेन पार्क, नेहरू वनोद्यानात टाटा ट्रस्टच्या वतीने बॉटनिकल गार्डन, रिलायन्सच्या माध्यमातून गोदापार्क, शिर्के उद्योग समूहातर्फे अहल्यादेवी होळकर पुलावर वॉटर कर्टन व शंभर फुटी कारंजा, जीव्हीकेमार्फत इतिहास वस्तु संग्रहालय आणि एल अॅण्ड टीमार्फत उड्डाणपुलाखाली सुशोभिकरण आदि प्रकल्प सीएसआर उपक्रमांतून साकारलेले आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने या नवनिर्माणाच्या आधारे मतदार पुन्हा आपल्याकडे वळविण्यासाठी धडपड चालविली आहे. त्यामुळे इतरांना नाशिक दर्शन घडवित इलेक्शन टूरिझमही सुरू केले आहे. मागील आठवड्यात ठाण्यातील काही नागरिकांना नवनिर्माणाचे दर्शन घडविण्यात आले, तर दोन दिवसांपूर्वी ‘राज’पुत्र अमित ठाकरे हे मित्रांना घेऊन आले होते. आता सुमारे ५० हून अधिक मराठी तारे - तारकांना आणून मनसे मंगळवारी नाशिकची सैर घडविणार आहेत. यावेळी त्यांच्यासमवेत अमित ठाकरे आणि मनसे चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकरही उपस्थित राहणार आहेत. चित्रपट कलावंतांना नवनिर्माणाचे प्रकल्प दाखवून त्यांचे अभिप्राय नाशिककरांसमोर ऐकविण्याचे नियोजन आहे. सदर नवनिर्माण पाहून नियोजनानुसार मराठी तारे-तारका कौतुकाची फुले उधळतील आणि त्यानिमित्ताने मनसेचाही प्रचार साधला जाईल. (प्रतिनिधी)
या कलावंतांची लागणार उपस्थिती
मनसेचे नवनिर्माण पाहण्यासाठी अभिनेता व निर्माता महेश मांजरेकर, सचिन पिळगावकर, अलका कुबल, संजय नार्वेकर, अवधूत गुप्ते, भाऊ कदम, वैभव मांगले, संजय मोने, पुष्कर क्षोत्री, रवि जाधव, सिद्धार्थ जाधव, सायली संजीव, मेधा मांजरेकर, मुग्धा कर्णिक, मेधा दाढे, माधवी निमकर, जितेंद्र जोशी, अंकित विश्वासराव, आनंद इंगळे आदि कलावंत मंडळी नाशिक टूरवर येणार आहे.