नाशिक महापालिकेसह सत्ताधारी भाजपाचेही ‘स्वच्छ सर्वेक्षण’च्या निकालाकडे नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 12:25 AM2018-05-08T00:25:04+5:302018-05-08T00:25:04+5:30
शहरांमध्ये स्पर्धेची भावना निर्माण करणे व शहरी क्षेत्रांमध्ये स्वच्छता सुनिश्चित करण्यावर भर देणे या उद्देशाने केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने जानेवारी ते मार्च २०१८ या कालावधीत राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेचा निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून, निकालाकडे नाशिक महापालिकेसह सत्ताधारी भाजपाचेही लक्ष लागून आहे. यंदा गत वर्षाच्या तुलनेत कामगिरी उंचावण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नाशिक : शहरांमध्ये स्पर्धेची भावना निर्माण करणे व शहरी क्षेत्रांमध्ये स्वच्छता सुनिश्चित करण्यावर भर देणे या उद्देशाने केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने जानेवारी ते मार्च २०१८ या कालावधीत राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेचा निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून, निकालाकडे नाशिक महापालिकेसह सत्ताधारी भाजपाचेही लक्ष लागून आहे. यंदा गत वर्षाच्या तुलनेत कामगिरी उंचावण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गेल्या तीन वर्षांपासून केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण मोहीम राबविली जात आहे. पहिल्या वर्षी देशभरातील ७३ शहरांमध्ये, तर दुसऱ्या वर्षी ४३४ शहरांमध्ये स्पर्धा घेण्यात आली होती. यंदा ४०४१ शहरांमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या वर्षी नाशिक शहराचा देशभरातील ७३ शहरांमध्ये ३१ वा क्रमांक आला होता, तर मागील वर्षी ४३४ शहरांच्या यादीत नाशिक १५१ व्या क्रमांकावर फेकले गेले होते. खतप्रकल्पाचे केलेले खासगीकरण, नव्याने धावणाºया घंटागाड्या, गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी अभियान, स्वच्छ भारत अभियानांतर्गत उभारण्यात आलेली साडेसहा हजार शौचालये यामुळे नाशिकचा पहिल्या दहा ते वीस शहरांच्या यादीत क्रमांक लागेल, असा दावा प्रशासनाकडून छातीठोकपणे केला जात होता. नाशिकच्या अगोदर नवी मुंबई- ८, पुणे- १३, बृहन्मुंबई- २९, शिर्डी- ५६, पिंप्री चिंचवड- ७२, चंद्रपूर- ७६, अंबरनाथ- ८९, सोलापूर- ११५, ठाणे- ११६, धुळे- १२४, मीरा-भार्इंदर- १३०, नागपूर- १३७, वसई विरार- १३९, इचलकरंजी- १४१ या शहरांचा क्रमांक लागला होता. मागील वर्षी क्रमांकात घसरण झाल्यानंतर दत्तक घेतलेल्या नाशिकची सन २०१८ मध्ये होणाºया स्पर्धेत कामगिरी उंचावली पाहिजे असा आग्रह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धरला होता. त्यानुसार, महापालिका प्रशासनाने सहा महिने अगोदरच तयारी सुरू केली होती. स्वच्छ सर्वेक्षणाबाबत जागृतीवर भर देण्यात आला होता. सत्ताधारी भाजपाकडूनही मुख्यमंत्र्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रयत्न करण्यात आले होते. मागील वर्षी ४ मे रोजी स्वच्छ सर्वेक्षणाचा निकाल जाहीर झाला होता. यंदा मात्र निकालाला उशीर झाला असून, निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. यंदा गतवेळच्या तुलनेत कामगिरीत नक्कीच सुधारणा होईल, असा दावा प्रशासनातील अधिकाºयांकडून केला जात आहे.
सत्ताधाºयांची प्रतिष्ठा पणाला
मागील वर्षी महापालिकेची सार्वजनिक निवडणूक होऊन भाजपा सत्तेवर आली. मागील वर्षी स्वच्छ सर्वेक्षणात नाशिकचा १५१ वा क्रमांक आल्यानंतर सत्तेत आलेल्या भाजपाने सदर स्पर्धा मनसेच्या सत्ताकाळात झाल्याचे सांगत त्यातून आपली मान सोडवून घेतली होती. यंदा मात्र भाजपाच्या सत्ताकाळात सर्वेक्षण झाले आहे. त्यातच मुख्यमंत्र्यांनी गतवर्षाच्या तुलनेत कामगिरी उंचावण्याचा आग्रह धरलेला आहे. त्यामुळे, सत्ताधारी भाजपाच्या दृष्टीने यंदाचा निकाल हा प्रतिष्ठेचा बनला असून, निकालाकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.