चोरट्यांनी लावलेल्या आगीत आठ लाखांचा ऐवज खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2021 12:31 AM2021-02-01T00:31:40+5:302021-02-01T00:32:12+5:30
सिन्नर : तालुक्यातील पंचाळे येथे एका किराणा दुकानात चोरी करीत चोरट्यांनी आग लावून पोबारा केल्याची खळबळजनक घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या घटनेत ४४ हजारांची चोरी झाली असून सुमारे सात ते आठ लाखांचा ऐवज भस्मसात झाला.

पंचाळे गावात दिनकर मारुती आसळक यांचे माऊली किराणा ॲण्ड जनरल स्टोअर्स हे दुकान आहे. बुधवारी मध्यरात्री एक ते दीडच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाचा मागील पत्रा उचकटून आत प्रवेश केल्याचा अंदाज आहे. आसळक यांनी भिशीचे ४४ हजार रुपये गल्ल्यात ठेवलेले होते. तसेच चार-पाच हजारांची इतर रक्कमही होती. ते चोरून पोबारा करताना अज्ञात चोरट्यांनी दुकानाला आग लावल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
आगीत किराणा माल, फ्रीज, टीव्ही, मोबाईल ॲक्सेसरीज, फर्निचर व इलेक्ट्रीकल साहित्य जळून खाक झाले. दुकानात सीसीटीव्ही लावलेले आहेत. मात्र चोरट्यांनी कॅमेरे फिरवून चोरी केल्याचा अंदाज आहे. आगीत कॉम्प्युटर सिस्टीमही जळाली आहे. तथापि, अर्धवट जळालेली हार्ड डिस्क डाटा रिकव्हर करण्यासाठी मुंबई येथे पाठविण्यात आली आहे. याबाबत आसळक यांनी एमआयडीसी पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राम भवर पुढील तपास करीत आहेत.