अंबासनमधील लाखोंचा अपहार
By admin | Published: June 26, 2015 01:47 AM2015-06-26T01:47:26+5:302015-06-26T01:50:40+5:30
अंबासनमधील लाखोंचा अपहार
नाशिक : अंबासन (ता.बागलाण) ग्रामपंचायतींतर्गत झालेल्या विविध कामांमध्ये लाखो रुपयांची अनियमितता झाली असून, दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेसमोेर उपोषण केले. दरम्यान, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील गायकवाड यांनी १३व्या वित्त आयोगाच्या निधीतून सुमारे सहा लाखांचा अपहार झाल्याप्रकरणी बागलाण पोलीस ठाण्यात दोन दिवसांत संबंधित सरपंच व ग्रामसेवक यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश गटविकास अधिकारी बहिरम यांना दिले. तसेच ग्रामस्थांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश नंदनवरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक अरविंद मोरे व जिल्हा कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोराडे अंबासन गावी चौकशीसाठी जाणार आहेत. अंबासन ग्रामपंचायतींतर्गत १३व्या वित्त आयोगातून भूमिगत गटार योजनेसाठी ११ लाख ९९ हजार रुपयांचे अनुदान ग्रामपंचायतीला प्राप्त झाले. पैकी ५ लाख ९६ हजार ४२७ रुपयांचे मूल्यांकन आढळून आले नाही. ही रक्कम संशयित अपहाराची असल्याचे याप्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीने गटविकास अधिकारी यांना दिलेल्या अहवालात म्हटले आहे.