व्यापाऱ्यावर गोळीबार करून साडेतीन लाखांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 01:40 AM2019-03-31T01:40:29+5:302019-03-31T01:40:44+5:30
शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कुलकर्णी कॉलनीमधील गजानन स्मृती अपार्टमेंटच्या वाहनतळात तिघा हल्लेखोरांनी पिस्तूलने गोळीबार करत व्यापाऱ्याची जबरी लूट केल्याची घटना शनिवारी (दि.३०) रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास घडली.
नाशिक : शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कुलकर्णी कॉलनीमधील गजानन स्मृती अपार्टमेंटच्या वाहनतळात तिघा हल्लेखोरांनी पिस्तूलने गोळीबार करत व्यापाऱ्याची जबरी लूट केल्याची घटना शनिवारी (दि.३०) रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास घडली. हल्लेखोरांनी एअरगनद्वारे फायर केल्याचे पोलिसांनी सांगितले. यावेळी व्यावसायिकाच्या हातातील साडेतीन लाख रुपयांची रोकड असलेली बॅग हल्लेखोरांनी लांबविली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, साधुवासवानी रस्त्यावरील कुलकर्णी गजानन स्मृती अपार्टमेंटच्या आठव्या क्रमांकाच्या सदनिकेत राहणारे विराग चंद्रकांत शाह (३८) हे गोळे कॉलनीमधील त्यांच्या पूनम एंटरप्रायजेस या होलसेल वैद्यकीय साहित्य विक्रीचे दुकान आटोपून दुचाकीवरून घरी आले. यावेळी त्यांचा पाठलाग करत एका स्पोर्टस बाइकवरून तिघे युवक अपार्टमेंटच्या वाहनतळापर्यंत आले. त्यावेळी तिघांपैकी एकाने त्यांच्या दिशेने पिस्तूल (एअरगन) रोखून फायर केले. यामुळे शाह घाबरून वाहनतळातून जिन्याकडे पळताना पडले. त्यांच्या हातातून दोघा हल्लेखोरांनी रोकड असलेली बॅग हिसकावून तत्काळ दुचाकीवरून पळ काढला. सुदैवाने या हल्ल्यात शहा बचावले. यावेळी ज्याच्या हातात पिस्तूल होते तो वाहनतळातून चालत बाहेर आला. यावेळी समोरील बंगल्यावरील वॉचमन सुभाष कारगोडे हे घराबाहेर धावत आल्याने त्याने त्यांच्या दिशेने पिस्तूल रोखून दम भरल्यामुळे सुभाष यांनी घाबरून बंगल्यातील मोटारीमागे लपले. त्यावेळी तिसरा हल्लेखोर दोघा साथीदारांसोबत दुचाकीवर बसून फरार झाला.
या घटनेनंतर विराग यांनी तत्काळ घरी जाऊन सर्व प्रकार सांगत पोलीस नियंत्रण क क्षाला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त अशोक नखाते, अमोल तांबे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सांगळे, सोमनाथ तांबे आदींनी घटनास्थळी धाव घेतली.
गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान
शहरात गुन्हगोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, आचारसंहिता लागू होऊनदेखील गुन्हेगारीच्या घटना थांबता थांबत नसल्याने पोलिसांपुढे आव्हान निर्माण झाले आहे. पंचवटीत पोलिसांवर दरोडेखोरांनी केलेला गोळीबार असो किंवा पावणेतीन लाख रुपयांची घरफोडीची घटना असो आणि शनिवारी थेट अपार्टमेंटच्या वाहनतळात येऊन पिस्तूलचा धाक दाखवून साडेतीन लाख रुपयांची रोकडची बॅग हिसकावून नेण्याची घटना असो, या सर्व घटनांमुळे शहर व परिसर हादरला आहे. सातत्याने एकापाठोपाठ घडणाºया गुन्हेगारीच्या घटनांमुळे पोलिसांचे कोम्बिंग आॅपरेशन, मिशन आॅल आउटसारख्या मोहिमांविषयी नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
तिघांच्या चेहºयावर मास्क
तिघे हल्लेखोर स्पोर्टस् बाइकवरून चेहºयाला मास्क लावून आले होते, असे परिसरातील प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले. कुलकर्णी कॉलनीमधील पथदीप जुनाट व नादुरुस्त असल्याने मुख्य रस्त्यावर फारसा प्रकाश रात्रीच्या वेळी नसतो. त्यामुळे काही प्रत्यक्षदर्शी नागरिकांनाही त्यांची दुचाकीसह हल्लेखोरांचे वर्णन सहजरीत्या दिसणे अवघड झाले. या संपूर्ण परिसरात कोठेही सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने पोलिसांपुढे या हल्लेखोरांना शोधून काढणे मोठे आव्हान राहणार आहे.