वजनकाट्याला दगड बांधत व्यापाऱ्याकडून लूटमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:16 AM2021-09-23T04:16:27+5:302021-09-23T04:16:27+5:30
नाशिक जिल्ह्यात टोमॅटोचा हंगाम सुरू होताच आठवडाभरातच दर कोसळले. दर्जेदार टोमॅटो कवडीमोल मिळू लागल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक ...
नाशिक जिल्ह्यात टोमॅटोचा हंगाम सुरू होताच आठवडाभरातच दर कोसळले. दर्जेदार टोमॅटो कवडीमोल मिळू लागल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला होता. गाडी भाडे द्यावे की शेतमजुरांची मजुरी. इंधन दरवाढीने देखील शेतमाल दळणवळण करणे मुश्कील झाले आहे आणि त्यात कवडीमोल टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची नामुष्की शेतकऱ्यावर आली होती. मात्र, अनंत चतुर्दशी झाल्यावर दरात सुधारणा झाली आहे. कुठेतरी टोमॅटोला भाव मिळू लागले. मात्र व्यापारी कशाप्रकारे शेतकऱ्यांची लूट करत आहेत ते देखील शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे चव्हाट्यावर आले. पिंपळगाव बाजार समितीत व्यापाऱ्यांकडून वजनकाट्याला दगड बांधण्याचे षड्यंत्र शेतकऱ्यांनी हाणून पाडले आहे. आता बाजार समिती प्रशासनाने संबंधित व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करत त्याचा परवाना रद्द करण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.