प्रवाशाला रिक्षात बसवून मध्यरात्री लुटमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2022 01:39 AM2022-04-27T01:39:17+5:302022-04-27T01:39:35+5:30
मुंबईला जाण्यासाठी वाहनाच्या प्रतीक्षेत उभ्या असलेल्या एका प्रवाशाला रिक्षाचालकाने रिक्षात बसवून ‘लिफ्ट’ देण्याचा बनाव करत लुटमार केल्याची धक्कादायक घटना घडली. रिक्षाचालकाने त्यास उड्डाणपुलावर घेऊन जात मारहाण करत साथीदारांच्या मदतीने ढकलून दिले. यामुळे मुंबईकर प्रवासी रात्रभर बेशुद्धावस्थेत पडून होता, असा प्रवाशाचा दावा आहेे; मात्र या प्रवाशावर यापूर्वीच गुन्हे असल्याची माहिती असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
नाशिक : मुंबईला जाण्यासाठी वाहनाच्या प्रतीक्षेत उभ्या असलेल्या एका प्रवाशाला रिक्षाचालकाने रिक्षात बसवून ‘लिफ्ट’ देण्याचा बनाव करत लुटमार केल्याची धक्कादायक घटना घडली. रिक्षाचालकाने त्यास उड्डाणपुलावर घेऊन जात मारहाण करत साथीदारांच्या मदतीने ढकलून दिले. यामुळे मुंबईकर प्रवासी रात्रभर बेशुद्धावस्थेत पडून होता, असा प्रवाशाचा दावा आहेे; मात्र या प्रवाशावर यापूर्वीच गुन्हे असल्याची माहिती असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
मुंबई नाका पोलिसांत अज्ञात रिक्षाचालकासह चार साथीदारांनी जबरी चोरी केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. अभिनेष जगन्नाथ गुप्ता (३५ रा. संयोग चाळ, भांडूप) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे; मात्र गुप्ता याची तक्रार पोलिसांना चक्रावून टाकणारी आहे, कारण त्याने यापूर्वी नशेमध्ये गुन्हे केल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे गुप्तासोबत लुटमारीचा प्रसंग खरोखरच घडला की त्याने खोटी तक्रार दिली, याचा तपास पोलीस करत आहेत.
त्याच्या तक्रारीनुसार गुप्ता हे मुंबईकडे जाण्यासाठी द्वारका परिसरात उभे होते. त्यावेळी एका रिक्षामध्ये चालकासह त्याचे चार साथीदार आले. त्यांनी गुप्ता यास ‘मुंबईसाठी वाहन मिळणार नाही. पुढे गेल्यावर वाहन मिळेल, तिथेपर्यंत सोडून देतो’ असे सांगितले. गुप्ता रिक्षामध्ये बसले आणि द्वारका चौकातून उड्डाणपुलावर रिक्षा गेली असता अज्ञात रिक्षा चालकासह साथीदारांनी गुप्ता यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांच्या खिशातून ४ हजारांची रोकड, मोबाईल काढून घेत त्यांना बेवारसपणे उड्डाणपुलावर ढकलून देत पोबारा केला, असे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. मारहाणीमुळे बेशुद्ध झालेले गुप्ता सकाळपर्यंत उड्डाणपुलाच्या कडेला होते. सकाळी त्यांना पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांना शुद्ध आल्यावर त्यांनी पोलिसांकडे आपबिती सांगितली. यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, गुप्ता यांना रिक्षाचे वर्णन किंवा क्रमांक तसेच रिक्षाचालकाचे, साथीदारांचे वर्णन असे काहीही सांगता न आल्यामुळे या घटनेविषयी संभ्रमावस्था आहे.