15 लाखांची लूट पल्सर गॅंगने केल्याचा केवळ होता बनाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 10:51 PM2021-02-06T22:51:20+5:302021-02-06T22:51:46+5:30
रोलेट व्यावसायिकाची रक्कम पाठविण्याचा आखला डाव
नाशिक : मुंबईनाका येथे शुक्रवारी (दि.५) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास अचानकपणे भरदिवसा मोटारीची काच फोडून पल्सरवर आलेल्या दुचाकीस्वारांनी सुमारे १५ लाखांची जबरी लूट केल्याची घटना घडली होती. या गुन्ह्याचा तपास करताना रोलेट जुगार चालविणाऱ्या कथित व्यावसायिकांनी या जबरी लुटीचा केवळ बनाव रचल्याचे शनिवारी (दि.६) उघडकीस आले. याप्रकरणी मुंबईनाका पोलिसांनी फिर्यादीसह दोघांना अटक केली आहे.
मुंबईनाका परिसरात महामार्गाच्या समांतर रस्त्यावर शुक्रवारी उभी असलेली स्विफ्ट कारची (एमएच १५- एचजी २८६८) काच फोडून पल्सरवरुन आलेल्या दोघा अनोळखी व्यक्तींनी कारची पाठीमागील दरवाजाची काच फोडली आणि कारमध्ये ठेवलेली १५ लाखांची रक्कम घेत पोबारा केल्याची घटना समोर आली होती. या घटनेवरून फिर्यादी मयूर राजेंद्र भालेराव (२५,रा. नावदरवाजा, तिवंधा चौक) याने दिलेल्या तक्रारीवरून मुंबईनाका पोलिसांकडून जबरी लुटीचा गुन्हाही दाखल करण्यात आला. तसेच चार पथकेही संशयितांच्या शोधार्थ रवाना केली गेली.
सर्वत्र नाकाबंदी करून संशयितांचा फिर्यादी भालेराव याने सांगितलेल्या वर्णनावरून शोध घेण्यास सुरुवात झाली; मात्र कोणत्याही पथकाच्या हाती कुठलाही सुगावा लागत नसल्याने पोलिसांना भालेराववर संशय आला. यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी भालेरावला पोलीस ठाण्यात बोलावून त्याची कसून चौकशी केली. यावेळी पोलिसांची दिशाभूल करत जबरी लूट झाल्याचा बनाव केल्याचे तपासात पुढे आले. शहरात कुठल्याहीप्रकारची पल्सर गँग नसून कोणीही दुचाकीने भरधाव येत कारची काच फोडून रक्कम लांबविली नसल्याचे स्पष्ट झाले.
भालेराव व त्याचा मित्र संशयित रामा शिंदे यांनी संगनमताने हा जबरी लुटीचा बनाव रचल्याचे उघड झाले असून पोलिसांनी भालेरावसह त्याचा मित्र रामा शिंदे यास ताब्यात घेतले आहे. उर्वरित दोघे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. रोलेट नावाचा जुगार चालविणारा इसम कैलास शहा याच्यासोबत झालेल्या जुन्या भांडणाचा राग मनात धरत संशयित भालेराव व त्याच्या मित्रांनी संगनमताने शहा याच्याशी वचपा काढण्यासाठी त्याने दिलेली १५ लाखांची रक्कम लांबविण्याचा कट रचल्याचे तपासात पुढे आल्याचे पोलिसांनी सांगितले.