प्रभू श्रीरामांचे काच शिल्प साकारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 01:20 IST2020-08-04T23:33:16+5:302020-08-05T01:20:00+5:30
नाशिक : राममंदिराच्या बुधवारी होणाऱ्या भूमिपूजनासाठी अयोध्यानगरी सजली असताना अहमदनगर येथील शिल्पकार प्रभू रामाचे काच प्रकारातील शिल्प साकारण्यात व्यस्त आहेत. अयोध्येच्या मंदिर परिसरात हे शिल्प लावण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

प्रभू श्रीरामांचे काच शिल्प साकारणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : राममंदिराच्या बुधवारी होणाऱ्या भूमिपूजनासाठी अयोध्यानगरी सजली असताना अहमदनगर येथील शिल्पकार प्रभू रामाचे काच प्रकारातील शिल्प साकारण्यात व्यस्त आहेत. अयोध्येच्या मंदिर परिसरात हे शिल्प लावण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
अयोध्येतील राममंदिराचे भूमिपूजन बुधवारी (दि.५) होत आहे. त्यानंतर मंदिराच्या निर्माण व सजावटीच्या कामाला प्रारंभ होणार आहे. या सजावटीसाठी अहमदनगरचे मूर्तिकार हेमंत दंडवते प्रभू श्रीरामांचे काच शिल्प साकारत आहेत. श्रीराम यांची छबी असलेले ग्लास म्युरल (द्विमितीय) पद्धतीचे हे शिल्प आहे. विशिष्ट प्रकारच्या काचेच्या तुकड्यांचा वापर करत ते साकारण्यात येत आहे. आराखडा, चित्र रेखाटन, फार्मा कटिंग, दुर्मीळ प्रकारचा आरसा तुकडा कटिंग, चॅम्फर पॉलिश, अॅसिड टेक्शचर, अल्ट्रा व्हायलेट लाइट विशिष्ट ग्ल्यूद्वारे पेस्टिंग अशा दीड महिन्याच्या प्रयासानंतर हे शिल्प अंतिम आकार घेणार आहे.
त्यानंतर ते अयोध्येकडे पाठविले जाणार आहे. हे शिल्प मंदिरात बसविण्यात यावे यासाठी दंडवते यांनी मंदिर ट्रस्टशी पत्रव्यवहार केला असून, लवकरच त्यासाठीची परवानगी मिळण्याची त्यांना अपेक्षा आहे. दंडवते यांनी आतापर्यंत साकारलेल्या सहा कलाकृतींची लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे. काच कलाक्षेत्रात स्टेन ग्लास, एअर ब्रशिंग, इचिंग, एनग्रेव्हिंग, अॅसिड टेक्शचर अशा अवघड पद्धतीचा वापर करून कलाकृती आकारास येत असतात. इतर माध्यमांपेक्षा ही कला किचकट, आव्हानात्मक असते. या कलाकृती साकारताना इजा होण्याचाही धोका असतो. मात्र त्यानंतरही कलाकृती साकारल्याचा आनंद अद्वितीय असतो.
-हेमंत दंडवते, मूर्तिकार, डेको ग्लास आर्ट