भगवान त्र्यंबकराजाचा रथोत्सव सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 06:04 PM2019-11-12T18:04:58+5:302019-11-12T18:06:36+5:30
त्रिपुरारी पौर्णिमा : भाविकांची दर्शनासाठी दुतर्फा गर्दी
त्र्यंबकेश्वर : त्रिपुरारी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि.१२) भगवान त्र्यंबकराजाचा रथोत्सवाचा सोहळा विद्युत रोषणाईत फटाक्यांच्या आतषबाजीत आणि देवस्थानच्या बँडपथकाच्या निनादात पार पडला. हा रथोत्सव पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी त्र्यंबकेश्वरी गर्दी केली होती.
भगवान त्र्यंबकेश्वराची दुपारी ४ वाजेच्या सुमारास रथातुन मिरवणुक सुरू झाली. शाही पेशवे थाटात निघालेल्या या रथाचे दुतर्फा भाविकांनी स्वागत करत दर्शनाचा लाभ घेतला. सदर रथ हा पेशव्यांचे सरदार विंचुरकर यांनी त्र्यंबकेश्वर मंदिराला प्रदान केल्याने व मंदिराचा जीर्णोध्दारच पेशव्यांनी केल्याने देवस्थान कारभारावर पेशव्यांची छाप दिसते. आजही देवस्थानच्या पदरी भालदार चोपदार, शागीर्द आदी पदे कार्यरत आहेत. त्यानुसार या रथोत्सवात भालदार -चोपदार आदींसह देवस्थानचे विश्वस्त मंडळ न्या.बोधनकर, त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा पदसिद्ध सचिव डॉ. प्रवीण निकम, दिलीप तुंगार, सत्यप्रिय शुक्ल, प्रशांत गायधनी, अॅड. संतोष दिघे, अॅड पंकज भुतडा, संतोष कदम व सौ.तृप्ती धारणे, देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजाभाऊ जोशी, मुख्य प्रशासकीय अधिकारी समीर वैद्य, मुख्य सुरक्षा अधिकारी अमित टोकेकर, जनसंपर्क अधिकारी रश्मी जाधव, सहा. मुख्य कार्यकारी अधिकारी यादव भांगरे आदी सहभागी झाले होते. रथात पंचमुखी सुवर्ण मुखवटा ठेवण्यात आला. रथाची मिरवणूक निघण्यापूर्वी रथाची पारंपारिक पुजा सरदार विंचुरकरांच्या वतीने त्यांच्या पुरोहितांनी केली. यावेळेस रथाला पाच बैलजोड्या जोडण्यात आल्या होत्या. सायंकाळी पाच वाजता रथ कुशावर्त तीर्थावर पोहचला.