नदीकाठालगत विक्रेत्यांची तारांबळ
By admin | Published: August 1, 2016 01:10 AM2016-08-01T01:10:50+5:302016-08-01T01:11:05+5:30
व्यवसाय ठप्प : नदीपात्रात पोहण्याचा लुटला आनंद
नाशिक : गोदावरी नदीपात्रात दोन टप्प्यांत धरणातून करण्यात आलेल्या अडीच हजार क्यूसेक पाण्याच्या विसर्गामुळे गोदावरीला पूर आला होता. वीस दिवसांपूर्वी आलेल्या पुराच्या तुलनेत रविवारी (दि.३१) नदीपात्राच्या पाण्याची पातळी कमीच राहिल्याने कु ठल्याही प्रकारचे नुकसान झाले नाही.
पावणे दहा वाजेच्या सुमारास अग्निशामक दलाचा पंचवटी केंद्राचा रेस्क्यू बंब घटनास्थळी रबर बोटीसह दाखल झाला. दरम्यान, तातडीने जवानांनी ध्वनिक्षेपकांवरून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत गोदाकाठापासून सुरक्षितस्थळी जाण्याच्या सूचना देण्यास सुरुवात केली. देवमामलेदार मंदिराजवळील नागरिक, नीळकंठेश्वर मंदिर ते भांडीबाजारापर्यंतची दुकाने विक्रेत्यांनी तत्काळ बंद केली. तसेच भाजीबाजारामधील विक्रेत्यांनीदेखील पटांगण सोडून नारोशंकर मंदिराच्या रस्त्यालगत आश्रय घेतला. धरणातून आलेल्या पाण्यामुळे नदीकाठालगत विक्रेत्यांची तारांबळ उडाली. नदीवरील लहान पूल पाण्याखाली गेले होते. रोकडोबा मैदानापर्यंत पुराचे पाणी आले होते. नदीपात्रात दोन टप्प्यांमध्ये सोडण्यात आलेल्या पाण्याने लहान मंदिरे पाण्याखाली गेली होती. दुपारी दोन वाजेनंतर नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये अधिक वाढ झाल्याचे दिसून आले. जलसंपदा व पूर नियंत्रण विभागाने दिलेल्या माहितीनुसार अडीच वाजेपासून अहल्यादेवी होळकर पुलाखालून नदीपात्रात सुमारे अडीच हजार क्यूसेक पाणी प्रवाहित होत होते. वीस ते पंचवीस दिवसांपूर्वी आलेल्या पावसाच्या पाण्यामुळे नदीपात्रात दुपारी अडीच वाजेपर्यंत साडेतीन हजार क्यूसेक पाणी पोहचले होते. त्यामुळे दोन वर्षांत प्रथमच नदी दुथडी भरून वाहिली. (प्रतिनिधी)