खुल्या पुरोगामी विचारांचा अभ्यासक गमावला
By admin | Published: April 16, 2015 12:38 AM2015-04-16T00:38:52+5:302015-04-16T00:44:31+5:30
रावसाहेब कसबे : शोकसभेत पुरोगामी संघटनांनी वाहिली श्रद्धांजली
नाशिक : डॉ. यशवंत सुमंतच्या जाण्याने समविचारी मित्र हरपला असून, हे अंत:करणासाठी अत्यंत वेदनादायी आहे. मितभाषी व मृदू स्वभावाचा आणि खुल्या पुरोगामी विचारांचा अभ्यासक राज्यातील पुरोगामी चळवळीने गमावला, अशा शब्दामध्ये ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी आदरांजली वाहिली.
ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत व परिवर्तनवादी लेखक डॉ. यशवंत सुमंत यांचे नुकतेच निधन झाले. शहरातील पुरोगामी संघटनांच्या वतीने सीबीएसवरील हुतात्मा स्मारकात सुमंत यांच्या शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी सुमंत यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कसबे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. ते म्हणाले, यशवंत यांच्या जाण्याने पुरोगामी चळवळीची कधी न भरून निघणारी हानी झाली आहे. एक खुल्या विचारांचा मित्र व साध्या सोप्या भाषेत परिवर्तनवादी तत्त्वज्ञान सांगणारा अभ्यासक म्हणून त्यांना विसरणे अवघड आहे. १९८० पर्यंत पुरोगामी विचारांच्या साचलेल्या डबक्यांना छेद देऊन या राज्यात वैचारिक प्रवाहाला गती देण्याचे अत्यंत महत्त्वाचे योगदान यशवंत यांनी चळवळीसाठी दिले आहे. महात्मा गांधी यांच्याप्रमाणेच यशवंत यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मार्क्स यांचेही आकर्षण होते. त्यामुळेच त्यांना सगळ्यात ‘तरुण’ विचारवंत असे म्हटले जात होते. या जगामध्ये केवळ अध्यात्म आणि विज्ञान या दोनच गोष्टी चिरंतन आहे, अशा साध्या सोप्या भाषेत यशवंत तत्त्वज्ञान समजावून देत होता. त्यांच्या लेखणी व वाणीने या राज्यात पुरोगामी विचारांचा झरा नेहमीच खळखळता ठेवला. यावेळी व्यासपीठावर प्रा. सुरेश जोंधळे, स्वातंत्र्यसैनिक वसंतराव हुदलीकर, छाया देव, राजू देसले, मंगला गोसावी, मुकुंद दीक्षित, डॉ. प्रदीप जायभावे, कृष्णा चांदगुडे, सचिन मालेगावकर यांच्यासह पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.