भाजीबाजारात नियमांना ‘खो’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 10:10 PM2020-04-21T22:10:17+5:302020-04-21T22:12:09+5:30
सिन्नर : सोशल डिस्टन्सिंगला हरताळ; १७ दुचाकी जप्त
सिन्नर : नगर परिषदेच्या वतीने आडवा फाट्यावरील वंजारी समाजाच्या मैदानात तात्पुरत्या हलवण्यात आलेल्या भाजीबाजारात होणाऱ्या ग्राहकांच्या गर्दीला आवर घालण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवत दोन दिवसांत १७ दुचाकी जप्त केल्या.
भाजीबाजारात केवळ भाजीपाला घेण्यासाठी येणे अपेक्षित आहे. मात्र, अनेक दुचाकीस्वार बागेत फिरायला आल्याप्रमाणे संपूर्ण भाजीबाजार मोटारसायकलवरून फिरत असल्याची बाब पोलिसांच्या निदर्शनास आली. त्यातून भाजीबाजारात धुरळा उडवण्याबरोबरच सोशल डिस्टन्सिंगचेही भान कुणी ठेवत नसल्याने पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला.
सुरुवातीला दुचाकी वाहने बाहेर उभी करण्याबाबत सूचनाही करण्यात येत होती. पोलिसांच्या जीपवरील ध्वनिपेक्षकावरून त्याबाबत वारंवार घोषणाही करण्यात आली. मात्र, त्यानंतरही अनेक उत्साही दुचाकीचालक सुसाटपणे बाजारात फिरत होते. काही तर थेट दुकानांपर्यंत गाडी घेऊन जात खरेदी करत होते. त्यामुळे पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राजेश रसेडे यांनी शनिवारी (दि.१८) फिरणा-या १२ मोटारसायकली जप्त करून पोलीस ठाण्यात जमा केल्या व त्यांच्या मालकांविरोधात संचारबंदीच्या उल्लंघनाचा गुन्हा दाखल केला.
रविवारी (दि.१९) सहायक निरीक्षक विजय माळी यांनी पाच दुचाकीचालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करीत मोटारसायकली पोलीस ठाण्यात जमा केल्या आहेत. सर्वांवरील गुन्हे न्यायालयात वर्ग करण्यात आले असून, न्यायालयाच्या निकालानंतरच या मोटारसायकली मालकांना परत मिळू शकणार आहेत.