द्राक्ष बागायतदारांचे कोट्यवधींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 10:38 PM2020-04-08T22:38:30+5:302020-04-08T22:38:48+5:30

नाशिक : कोरोनामुळे देशभरात सुरू असलेल्या संचारबंदीचा सर्वाधिक फटका राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून, राज्यभरात सुमारे अडीच ते ...

The loss of billions of grape planters | द्राक्ष बागायतदारांचे कोट्यवधींचे नुकसान

द्राक्ष बागायतदारांचे कोट्यवधींचे नुकसान

googlenewsNext
ठळक मुद्देउत्पादक संकटात : अडीच ते तीन लाख टन माल पडून

नाशिक : कोरोनामुळे देशभरात सुरू असलेल्या संचारबंदीचा सर्वाधिक फटका राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून, राज्यभरात सुमारे अडीच ते तीन लाख टन माल पडून आहे. स्थानिक बाजारात सरासरी ३० रुपये किलोचा दर जरी गृहीत धरला तरी सुमारे ९०० कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
राज्यात नाशिक, सोलापूर, सांगली या जिल्ह्यांत प्रामुख्याने द्राक्ष पीक घेतले जाते. याशिवाय पुणे जिल्ह्याचा काही भाग आणि लातूर व उस्मानाबाद या जिल्ह्यात थोड्याफार प्रमाणात द्राक्ष पीक घेतले जाते. राज्यातील एकूण द्राक्ष उत्पादनात नाशिक जिल्ह्याचा सुमारे ८० टक्के वाटा आहे. जिल्हानिहाय थोडा मागेपुढे होत असला तरी राज्यात साधारणत: मे महिन्याच्या अखेरीपर्यंत द्राक्ष हंगाम सुरू असतो. दरवर्षी हे चक्र नियमित सुरू असते. यावर्षी मात्र त्यास खीळ बसली आहे.
द्राक्ष हंगाम ऐन बहरात असताना कोरोनामुळे देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले. अनेक शेतकºयांच्या बागेत माल असताना मजूर निघून गेले. माल वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला, यामुळे आज अनेकांचा माल शेतातच पडून आहे. याविषयी बोलताना सह्याद्री फार्म्स प्रोड्यूसर कंपनीचे तुषार जगताप म्हणाले, राज्यातील एकूण २५ ते ३० हजार एकर क्षेत्रावर अंदाजे अडीच ते तीन लाख टन माल तयार आहे, मात्र तो माल आज अडकून पडला आहे. माल काढला तरी त्याला दर मिळत नाही. खुल्या बाजारात ३० रुपये किलोचा दर मिळाला असतातरी सुमारे ९०० कोटींचे उत्पन्न शेतकºयांना मिळाले असते.
द्राक्षाला ५ ते १0 रुपये प्रतिकिलो दर
मानोरी : येवला तालुक्यासह सर्वत्र दीड महिन्यांपूर्वी निर्यातक्षम द्राक्षाला १०० ते १२५ रु पये प्रतिकिलो इतका उच्चांकी दर मिळत असल्याने शेतकºयांमध्ये आनंदाचे वातावरण असताना चीनमधून अन्य देशात प्रसार झालेल्या कोरोना व्हायरसचा परिणाम शेतमालाच्या दरावरदेखील पडू लागल्याने द्राक्ष आता सरासरी ५ ते १० रु पये प्रतिकिलो दराने विकली जात आहेत. अनेक ठिकाणी तर निर्यातक्षम द्राक्ष खरेदीला व्यापारीच मिळत नसल्याने हजारो हेक्टरवर असलेल्या द्राक्षबागा कोरोनामुळे धोक्यात आल्या असल्याचे दिसून येत असून, द्राक्ष उत्पादक शेतकºयांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. मागील १५ दिवसांपासून सर्वत्र लॉकडाउन परिस्थिती असल्याने द्राक्ष निर्यातीला फटका बसला असून, अद्यापही हजारो क्विंटल द्राक्ष तोडणीअभावी तसेच पडून असून, एक्स्पोर्ट द्राक्ष निर्मितीसाठी केलेला लाखो रु पयांचा खर्च वाया जाण्याची भीती शेतकºयांमध्ये निर्माण झाली आहे. परिसरातील आठवडे बाजारही ठरावीक वेळ सुरू राहत असून, काही ठिकाणी तर बंदच असल्याने हतबल झालेल्या शेतकºयांनी आपल्या शेतातच द्राक्ष विक्र ी सुरू केली आहे.

निर्यात पूर्णपणे थांबली
मागील वर्षी सह्याद्री फार्म्स प्रोड्यूसर कंपनीने सुमारे १५०० कंटेनर द्राक्ष निर्यात केली होती. यावर्षी १२०० ते १३०० कंटेनर द्राक्ष निर्यातीचे उद्दिष्ट होते. त्यापैकी कंपनीने ८५० कंटेनर माल परदेशात पाठविला आहे. त्यानंतर कोरोनाचे संकट उभे रहिल्याने कंपनीची निर्यात पूर्णपणे थांबली आहे, अशी माहिती जगताप यांनी दिली.

Web Title: The loss of billions of grape planters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.