नाशिक: अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2021 10:05 PM2021-11-05T22:05:18+5:302021-11-05T22:06:05+5:30

भात - नागलीला ओलावा : शेतकरी हवालदिल 

loss of farmers due to sudden rains in nashik | नाशिक: अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान 

नाशिक: अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान 

Next

तुकाराम रोकडे, लोकमत न्यूज नेटवर्क

देवगांव (नाशिक) :त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगांव आणि परिसरात सायंकाळी अचानक पावसाने जोरदार हजेरी लावली. आगंतुकपणे  पाऊस आल्याने खळ्यावरील व शेतामधील पिके झाकतांना शेतकऱ्यांची फारच तारांबळ उडाली आहे. सकाळपासून वातावरणात उकाडा जाणवत होता. अचानकपणे ढगांनी जमवाजमव करून ढगांचे मळभ निर्माण होऊन मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सुमारे एक तास पावसाने बॅटिंग केल्यानंतर अर्धा पाउन तासानंतरही रिपरिप सुरू होती. 

दरम्यान, ऐन दिवाळीत कोसळल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांची पुरती धांदळ उडाली. दिवाळीसाठी नागरिकांनी केलेल्या सजावटीवर पाणी फेरले गेले. ग्रामीण भागात मुरुमाने अंगण घातलेली जागा ओली होऊन अंगण भिजल्याने नागरिकांना दिवाळीचा सण साजरा करण्यावर विरजण पडले तर बच्चे कंपनी पावसामुळे फटके वाजता येणार नसल्यामुळे नाराज झाली.

आज दुपारी ३ ते  ३:३० वाजेच्या दरम्यान हलके शिंतोडे पडायला सुरुवात झाली होती. एव्हढ्या मोठ्या प्रमाणावर पावसाचे प्रमाण वाढेल असे वाटत नव्हते. त्यामुळे शेतकरी बांधव पूर्णतः गाफील होता. परंतू अचानकच हलक्या सरींनी अल्पावधीतच मुसळधार स्वरुप धारण केले. बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आपली पिके कापून शेतातच वाळत ठेवली होती तर काहींनी खळ्यावर वाहुन उडवे रचून गंज मारुन ठेवले होते. अशा परिस्थितीत काही शेतकऱ्यांनी मिळेल त्या साहित्याने झाकपाक केली असली तरी ज्यांच्याकडे ऐनवेळी काहीच साधन सामूग्री नसल्याने उडव्यांची भिजून अक्षरशः वाताहत झाली आहे. यात ज्यांची पिके शेतातच पसरवून ठेवली होती त्यांचे मात्र अतोनात नुकसान झाले आहे. यामध्ये वावीहर्ष, टाकेदेवगाव, श्रीघाट, चंद्राचीमेटसह दस्तुरखुद्द देवगांवसह परिसरातील असंख्य शेतकरी नुकसानग्रस्त झालेले आहेत. 

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील नागली आणि भात ही उपजीविकेचे पिके आहेत. अवकाळी पावसाने  नेमके ह्याच पिकांचे अतोनात नुकसान केले असून शेकडो शेतकऱ्यांना त्याची झळ बसली आहे. त्यामुळे आमच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन आम्हाला भरपाई मिळावी अशी मागणी तालुक्यातील शेतकरी करीत आहेत.

Web Title: loss of farmers due to sudden rains in nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.