ओतूर परिसरात खरीपाचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 06:31 PM2019-11-12T18:31:56+5:302019-11-12T18:33:55+5:30
ओतूर : कळवण तालुक्यातील ओतूर परिसरात परतीच्या पावसाने खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. या पावसाने मका, सोयाबीन, बाजरी, भुईमुग, उन्हाळ कांद्याचे रोप या पिकाना मोठा तडाखा बसला आहे. सरकारी यंत्रणेने सरसकट पंचनामे केलेले आहेत परंतु शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतिक्षा लागून राहिली आहे.
हाता-तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावल्याने बळीराजा पूर्णपणे खचला आहे. शेतातील उभ्या पिकासह कापणी झालेल्या बाजरी व मका आदी खरीपाच्या उत्पन्नावर पाणी सोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आल्यामुळे त्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. पिकांच्या बी-बियाणे, खते व मजुरी यासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करावी यासह उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न शेतक-यांना सतावत आहे. खरीप पिकाच्या उत्पन्नावर रब्बी पिकाचे नियोजन अवलंबून असते परंतु यावर्षी नुकसानीपलिकडे शेतक-यांच्या हाताशी काहीच लागले नाही, त्यामुळे रब्बीची चिंता त्यांना सतावत आहे. रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात उन्हाळ कांद्याचे उत्पादन घेतले जाते, परंतु त्यासाठी लागणा-या रोपांचे नुकसान झाल्याने शेतकरी गेल्या दोन दिवसापासून रोपांची लागवड करण्यात मग्न आहे. खरीप हंगामाकडून नुकसान झाल्याने शेतक-यांना रब्बी पिकांच्या उत्पादनाची आस लागून आहे. उन्हाळी कांद्यावरच शेतकरी वर्गाचे पुढील नियोजन अवलंबून असते. पावसाने पंधरा ते वीस दिवस धुमाकुळ घातल्याने शेतातील मका व बाजरीची कापणी केलेल्या कणसांना कोंब फुटले आहेत. उभी पिके जास्त पाणी साचल्याने सडली आहेत. त्यामुळे शासनाने त्वरित उपाययोजना करु न शेतक-यांना भरपाई द्यावी अशी मागणीओतूर परीसरातील बळीराजाने केली आहे.