देशमाने परिसरात पावसाने पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 01:18 PM2019-09-27T13:18:16+5:302019-09-27T13:18:25+5:30
देशमाने - परिसरात उत्तरा नक्षत्राच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
देशमाने - परिसरात उत्तरा नक्षत्राच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पंधरा दिवसापूर्वी परिसरातील शेतकरीवर्ग जोरदार पावसाच्या प्रतिक्षेत होता. उत्तरा नक्षत्रात अखंडपणे जोरदार पाऊस झाल्याने कापणीस आलेले बाजरी व सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. कांद्याचे रोपे देखील अती पाण्याने मोठ्या प्रमाणावर कुजू लागली आहे. आगामी काळात लाल कांद्यासाठी मागणी राहणार असल्याने चांगला भाव मिळू शकतो या अपेक्षेने लावणीस आलेले कांद्याची रोपे व आगामी उन्हाळ कांद्यासाठी टाकलेल्या रोपांचे नुकसान झाल्याने कांदा लागवडीसाठी शेतकरी वर्ग मिळेल तेथून कांद्याची रोपे खरेदी करत आहे. परिणामी कांदा लागवडीचा खर्च दुप्पटीने वाढला आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसाचे प्रमाण असेच राहिले तर उर्वरित खरीप पिकांचे देखील नुकसान होणार असल्याने शेतकरी वर्ग हतबल झाला आहे.