दागिन्यांसह हरविलेली बॅग माहेरवाशिण महिलेच्या पुन्हा पदरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 02:25 PM2021-08-22T14:25:04+5:302021-08-22T14:29:27+5:30
या रिक्षाची माहिती घेतली असता रिक्षा नाशिकरोड भागातील असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी नाशिकरोड गाठले. तेथे तपास करत रिक्षाचा शोध घेतला असता, रिक्षामध्ये पाठीमागील बाजूस बॅग सुरक्षित असल्याचे पोलिसांना आढळून आले.
नाशिक : मुंबईहुन नाशिक शहरात आपल्या भाऊरायाला रक्षाबंधनाच्या औचित्यावर ओवाळण्यासाठी दाखल झालेल्या एका माहेरवाशिण अनावधानाने दागिने, रोकड असलेली बॅग रिक्षामध्ये विसरली. घरी गेल्यानंतर ही बाब त्यांच्या लक्षात आल्यानंतर मात्र त्यांच्या पायाखालून जमीन सरकली. त्यांनी ठक्कर बाजार बसस्थानकापासून रिक्षा केल्याने थेट सरकारवाडा पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तक्रार घेत तत्काळ सीसीटीव्ही फुटेजची पाहणी त्र्यंबकनाका परिसरात केली आणि रिक्षा वर्णनावरुन शोध घेण्यास सुरुवात केली. अवघ्या काही तासांत दागिन, रोकड असलेली बॅग सुरक्षितरित्या पदरी पडल्याने त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही.
सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीतील नवीन मध्यवर्ती बसस्थानकात सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास मनीषा प्रकाश मेहता या बसमधून मुंबईतून दाखल झाल्या. येथून त्यांनी कस्तुरबानगर येथे माहेरी जाण्यासाठी रिक्षा केली. दागिने, रोकड ज्या बॅगेत त्यांनी ठेवलेली होती, ती बॅग अनावधानाने मेहता या रिक्षातच विसरल्या. घरी आल्यानंतर जेव्हा त्यांनी सर्व बॅग तपासल्या तेव्हा त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यामुळे त्या प्रचंड घाबरल्या आणि आता दगिने हरविल्याने सासरी काय सांगायचे? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिल्याने त्या तणावाखाली आल्या. काही वेळेतच आपल्या नातेवाईकांसह त्यांनी सरकारवाडा पोलीस ठाणे गाठले. पोलिसांना घडलेला प्रकार कथन केला. तत्परतेने गुन्हे शोध पथकाने त्र्यंबकनाका गाठले. तेथील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत रिक्षा मेहता यांनी ओळखली. या रिक्षाची माहिती घेतली असता रिक्षा नाशिकरोड भागातील असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी नाशिकरोड गाठले. तेथे तपास करत रिक्षाचा शोध घेतला असता, रिक्षामध्ये पाठीमागील बाजूस बॅग सुरक्षित असल्याचे पोलिसांना आढळून आले. बॅग उघडून दागिने, रोकड सुरक्षित असल्याची पोलिसांनी खात्री पटविली. त्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रारदार मेहता यांना ही बॅग परत करण्यात आली. पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे माहेरवाशिण महिलेला तिचे हरविलेले दागिने, रोकड पुन्हा मिळाल्याचा आनंद चेहऱ्यावर झळकत होता.