‘कळसुबाई’चा हरविलेला रानगवा पुन्हा गवसला...!

By अझहर शेख | Published: October 28, 2021 12:59 AM2021-10-28T00:59:46+5:302021-10-28T01:00:20+5:30

वन्यजीव विभागाच्या नियंत्रणाखाली असलेल्या कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात तीन ते चार वर्षांपूर्वी रानगवा अधूनमधून स्थानिकांच्या नजरेस पडत होता; मात्र कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून तो अभयारण्यातून गायबच झाला होता. मंगळवारी (दि.२७) दुपारच्या सुमारास रानगव्याने स्थानिक युवकासह वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांना घाटघरच्या गवती कुरणामध्ये दर्शन दिले.

The lost rangwa of 'Kalsubai' was found again ...! | ‘कळसुबाई’चा हरविलेला रानगवा पुन्हा गवसला...!

‘कळसुबाई’चा हरविलेला रानगवा पुन्हा गवसला...!

googlenewsNext
ठळक मुद्देवन्यजीव विभाग सतर्क : घाटघरजवळील गवताळ कुरणामध्ये घडले दर्शन

नाशिक : वन्यजीव विभागाच्या नियंत्रणाखाली असलेल्या कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात तीन ते चार वर्षांपूर्वी रानगवा अधूनमधून स्थानिकांच्या नजरेस पडत होता; मात्र कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून तो अभयारण्यातून गायबच झाला होता. मंगळवारी (दि.२७) दुपारच्या सुमारास रानगव्याने स्थानिक युवकासह वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांना घाटघरच्या गवती कुरणामध्ये दर्शन दिले.

कळसुबाई-हरिश्चंद्रगड वन्यजीव अभयारण्यामध्ये पुन्हा रानगवा ऐन दीपावलीच्या तोंडावर परतल्याने आनंदाचे वातावरण पसरले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या सुरुवातीला रानगव्याच्या हालचाली अभयारण्यातील राजूर वनपरिक्षेत्रात तसेच भंडारदरा वनपरिक्षेत्रात पाहावयास मिळत होत्या; मात्र कोरोनापासून रानगव्याच्या अस्तित्वाच्या खुणा फारशा कोठेही दिसल्या नाहीत; मात्र मंगळवारी संपूर्ण वाढ झालेला व अंदाजे तीन ते चार वर्षे वयाचा रानगवा (नर) घाटगर वनपरिमंडळातील जंगलात दिसल्याचे वनक्षेत्रपाल अमोल आडे यांनी सांगितले. घाटघर परिसरातील रहिवासी युवक विजय गांगड याने सर्वप्रथम गव्याला बघितले आणि तातडीने त्याच्याजवळील मोबाइलमध्ये छायाचित्रे टिपली. वनमजुराला विजयने कळविताच भंडारदरा वनक्षेत्रपाल कार्यालयातून गस्ती पथक घाटघरच्या दिशेने रवाना झाले. यावेळी वनरक्षक महेंद्र पाटील यांनाही वाटेत रानगव्याने दर्शन दिले. रानगवा असल्याची खात्री पटल्यानंतर तत्काळ सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे, अमोल आडे, रवींद्र सोनार आदींनी स्थानिक गावकऱ्यांसह टेंट कॅम्पेनिंग करणाऱ्या युवकांची बुधवारी (दि.२८) बैठक बोलविली. बैठकीत रानगवा संवर्धनासह सुरक्षिततेच्या दृष्टीने घ्यावयाच्या खबरदारीबाबत विविध सूचना रणदिवे यांनी दिल्या आहेत.

--इन्फो--

रानगव्यासाठी पोषक वातावरण

अभयारण्य क्षेत्रात रानगव्याकरिता पोषक असा अधिवास उपलब्ध झाला आहे. अभयारण्यामधील इकोसिटी घाटघर, उडदावणे, पांजरे, रतनवाडी या भागात चारादेखील चांगला वाढला आहे. तसेच साम्रद, रतनवाडी, पांजरे भागात बेर या स्थानिक गवताच्या प्रजातीसह पवण्या, मारवेल या गवताच्या प्रजातींचीही लागवड यावर्षी वन्यजीव विभागाने केली आहे. पावसाळ्यात गवत वाढले आहे. अभयारण्यात रानगव्यासाठी चारा व उत्तम निवारा तयार झाला आहे. त्यामुळे रानगवा या भागात आता कधीपर्यंत मुक्काम ठोकतो, याकडे भंडारदरा-राजूर वनपरिक्षेत्रातील वन्यजीव विभागाच्या वनअधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.

--कोट--

अभयारण्य क्षेत्रातील भंडारदरा रेंजमधील सर्व गावांतील सरपंच, ग्रामपरिस्थितीकीय विकास समितीचे पदाधिकारी तसेच तंबू कॅम्पेनिंग करणारे युवक यांची संयुक्त बैठक घेतली आहे. रानगव्याबाबत त्यांना कल्पना देण्यात आली आहे. हा वन्यप्राणी कुठल्याही प्रकारे मनुष्यासाठी उपद्रवी नाही, त्यामुळे कोणीही घाबरून जाण्याचे कारण नाही. रानगवा अभयारण्यात येणे हे शुभवर्तमान आहे. गवा कोणालाही दिसल्यास त्याला कुठलाही त्रास देऊ नये.

- गणेश रणदिवे, सहायक वनसंरक्षक

Web Title: The lost rangwa of 'Kalsubai' was found again ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.