जीव गमवला; पैशांचा पाऊस पडलाच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 01:09 AM2019-09-28T01:09:00+5:302019-09-28T01:10:03+5:30
पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून एसटीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला पाच लाख रुपयांचा गंडा घालण्याचा प्रकार घडला. या प्रकारासाठी निवृत्त कर्मचाºयाने उसनवारीने घेतलेले पैसे परत करता न आल्याने त्यांनी मानसिक त्रासातून विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
पंचवटी : पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून एसटीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला पाच लाख रुपयांचा गंडा घालण्याचा प्रकार घडला. या प्रकारासाठी निवृत्त कर्मचाºयाने उसनवारीने घेतलेले पैसे परत करता न आल्याने त्यांनी मानसिक त्रासातून विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात माळेकर यांनी पैशाचा पाऊस पडण्याच्या आमिषाला भुलून आपल्या जमा पुंजीसह उसणवारीने घेतलेले पैसेही पणाला लावले, मात्र पैशाचा पाऊस तर पडलाच नाही उलट त्यांना मानसिक त्रासातून आपला जीव गमावाव लागल्याची घटना घटल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मखमलाबाद येथील स्वामी विवेकानंदनगरमधील गोकुळ रघुनाथ माळेकर यांनी याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. माळेकर यांचे वडील रघुनाथ माळेकर (५७) यांना काही दिवसांपूर्वी संशयित आरोपी अनिल कांबळे, परदेशी, खेताडे, पेंटर व कांबळे यांच्या बहिणीचा सासरा
(पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) अशांनी माळेकर यांना भेटून तुम्ही पाच लाख रुपये द्या, आम्ही पैशांचा पाऊस पाडतो असे आमीष दाखविले. या आमिषाला बळी पडून माळेकर यांनी स्वत:चे तसेच इतरांकडून जमा केलेले पाच लाख रुपये संशयितांना दिले. काही दिवसांनी संशयितांनी माळेकरांना पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अज्ञातस्थळी नेले. येथे माळेकर लघुशंकेसाठी गेले असता संशयितांनी त्यांना काम झाले असे सांगून ते परत निघाले. त्यामुळे माळेकर यांनी माझे पाच लाख रुपये परत करा, असे सांगताच संशयित आरोपींनी पैसे देण्यास टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे माळेकर यांनी मानसिक त्रासातून शनिवारी (दि.२१) राहत्या घरात काहीतरी विषारी औषध सेवन केले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. तेथे उपचार सुरू असताना सोमवारी (दि.२३) दुपारी त्यांचा मृत्यू झाला. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी अहिरे तपास करीत आहे.
चिठ्ठीमुळे प्रकरणाची उकल
एसटीचे सेवानिवृत्त कर्मचारी रघुनाथ माळेकर यांना पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून पाच लाख रुपयांना गंडा घातल्याने माळेकर यांनी विषारी औषध सेवन केले. मात्र त्यांनी या घटनेमागील हकिकत एका चिठ्ठीत लिहून ठेवली होती. विषारी औषध सेवन केल्यानंतर माळेकरांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता त्यांच्या खिशात ती चिठ्ठी आढळून आली. त्यावरून हा प्रकार उघडकीस आला आल्याचे पोलिसांनी सांगितले.