नाशिकला देदीप्यमान इतिहास : झेंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 12:47 AM2018-03-17T00:47:20+5:302018-03-17T00:47:20+5:30
नाशिक शहराला खूप मोठा आणि देदीप्यमान इतिहास आहे. शहरातील प्रत्येक चौक वेगळी आठवण बाळगून आहे. त्यांचा इतिहास जाणून घेतला तर समोरचा कधी अवाक् होतो, तर कधी आश्चर्याने आणि आनंदाने भारावून जातो. नवीन पिढीने हा इतिहास वेळ देऊन, थोडी मेहनत घेऊन नक्की जाणून घ्यावा, असे प्रतिपादन मधुकरअण्णा झेंडे यांनी केले.
नाशिक : नाशिक शहराला खूप मोठा आणि देदीप्यमान इतिहास आहे. शहरातील प्रत्येक चौक वेगळी आठवण बाळगून आहे. त्यांचा इतिहास जाणून घेतला तर समोरचा कधी अवाक् होतो, तर कधी आश्चर्याने आणि आनंदाने भारावून जातो. नवीन पिढीने हा इतिहास वेळ देऊन, थोडी मेहनत घेऊन नक्की जाणून घ्यावा, असे प्रतिपादन मधुकरअण्णा झेंडे यांनी केले. सार्वजनिक वाचनालयाच्या पुस्तक मित्रमंडळातर्फे आयोजित ‘चौकांचा इतिहास’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. व्यासपीठावर सावानाचे अध्यक्ष प्राचार्य विलास औरंगाबादकर, मिलिंद चिंधडे आदी उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की, पोथ्यापुराणातून नाशिकची मोठी माहिती मिळते. भद्रकाली, कालिकादेवी या नाशिकच्या ग्रामदेवता. आज नाशिक सुवर्ण त्रिकोण म्हणून प्रसिद्ध असले, तरी पूर्वी नाशिकला जनस्थान, दंडकारण्य, गुलशनाबाद अशी अनेक नावे होती. मनूचा पुत्र इश्वाक याचा पुत्र दंडक राजा याचे पूर्वी नाशिकवर राज्य होते. त्याच्या मोठ्या साम्राज्यात नाशिकचा समावेश होता. त्याच्याकडून एक चूक झाली. ऋषीमुनींनी त्याला राज्य बेचिराख होईल असा शाप दिला. तो शाप खरा ठरला आणि आजचे नाशिक आणि त्याकाळचे दंडकारण्य ओस पडले. पुढे हजारो वर्षांमध्ये नाशिकमध्ये विविध स्थित्यंतरे झाली आणि नाशिक शहराने आकार घेतला. प्र. द. कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. प्रारंभी स्व. नरहरी फेणे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
९० चौकांचा इतिहास मोठा रंजक
आज नाशिक मोठे शहर म्हणून ओळखले जाते. शहरातील ९० चौकांचा इतिहास मोठा रंजक आहे. तो ‘चौकांचा इतिहास’ नावाच्या पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक नाशिककराने हा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. आपल्या घरातील ज्येष्ठांशी संवाद साधून, पुस्तकांमधून, इंटरनेटद्वारे तो समजावून घेण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.