आवळबारीच्या पायथ्याशी प्रेमीयुगुलाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 05:52 PM2019-01-20T17:52:52+5:302019-01-20T17:58:39+5:30
बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील सावरगाव पठावेदिगर पैकी या आदिवासी गावालगत आवळ बारीच्या पायथ्याशी एका प्रेमी युगुलाने झाडावर गळफास घेऊन आत्महत्त्या केली. रविवारी सकाळी सदर प्रकार उघडकीस आला.
पंडित गणपत टोपले यांच्या शेत गट क्र. ६२ मधील आंब्याच्या झाडावर दोन मृतदेह लटकलेल्या अवस्थेत घटनास्थळालगत राहणाऱ्या वसंत काशीराम टोपले यांना रविवारी सकाळी निदर्शनास आले. त्यांनी पठावे दिगर येथील पोलीस पाटील दयाराम पवार यांना कळविल्यानंतर सटाणा पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली. पंचनामा करीत असताना पोलिसांना घटनास्थळाजवळ मोटारसायकल, ब्लँकेट, साडी तसेच आंब्याच्या झाडाला लटकलेले मृतदेह आढळून आले. तपासाअंती मयत बाळू मधुकर टोपले (३०, रा. पठावे दिगर) व आशाबाई पोपट चौरे (२५, रा. तुंगेल) असल्याचे निदर्शनास आले. ते दोघेही विवाहित त्यांना प्रत्येकी दोन अपत्ये आहेत. दोघेही मयत त्यांच्या कुटुंबासमवेत एक वर्षापासून सोग्रस फाटालगत नैताळे रोडवरील एका पोल्ट्री फार्मवर मजूरी करीत होते. त्याच दरम्यान त्यांचे प्रेमसंबंध जुळून आले होते. आशा ही महिन्यापूर्वी पोल्ट्रीचे कामकाज सोडून गावाकडे घर बांधण्यासाठी कुटुंबासमवेत परतली होती, तर बाळू हा आजीच्या निधनानिमित्त चार दिवसांपासून पठावे दिगर येथे आलेला होता.
तीन ते चार दिवसांपासून आशा बेपत्ता झाल्याने कुटुंबीय नातेवाईकांकडे तिचा शोध घेत होते. दरम्यान रविवारी पठावे दिगर येथे प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याची वार्ता परिसरात पसरली. चौकशीसाठी तुंगेल येथील आशाचे नातेवाईक पठावे दिगर येथे गेले असता तिची ओळख पटली. दोघांचे मृतदेह श्वविच्छेदनासाठी ग्रामीण रु ग्णालय डांगसौंदाणे येथे पाठविण्यात आले असून पुढील तपास सटाणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार व देवेंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.