अभ्यंगस्नानाच्या दिवशीच कमी दाबाने पाणी
By Admin | Published: October 28, 2016 11:27 PM2016-10-28T23:27:54+5:302016-10-28T23:29:20+5:30
पालिकेचा झटका : नरक चतुर्दशीला विस्कळीत होणार नियोजन
नाशिक : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर शहराला मुबलक पाणीपुरवठा करण्याची घोषणा करणारी महापालिका ऐन दिवाळीत म्हणजे शनिवारी नरक चतुर्दशीच्या दिवशीच कमी दाबाने आणि कमी प्रमाणात पाणीपुरवठा करणार आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण पंपिंग स्टेशन येथे बिघाड झाल्याने पाच विभागांतील पाणीपुरवठा विस्कळीत होणे शक्य असल्याचे महापालिकेने कळविले आहे. नाशिक शहराला गंगापूर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. येथे असलेल्या एका पंपसेटवरील चार फूट व्यासाच्या जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह नादुरुस्त झाल्याने बारा बंगला, पंचवटी, नीलगिरी बाग, गांधीनगर, नाशिकरोड या पाच जलशुद्धीकरण केंद्रांसाठी पाणीपुरवठा करणाऱ्यावर विपरीत परिणाम होणार आहे. महापालिकेने व्हॉल्व्ह दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले असले तरी ते काम वेळेत पूर्ण न झाल्यास नाशिक पूर्व व पश्चिम, पंचवटी आणि नाशिकरोड तसेच सिडकोतील पवननगर व सावतानगर जलकुंभावरून शनिवारी सकाळी होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने किंवा कमी प्रमाणात होण्याची शक्यता असल्याचे महापालिकेने कळविले आहे. शनिवारी नरक चतुर्दशी असून, पहिले अभ्यंगस्नान आहे, नागरिक पहाटे लवकर उठून स्नान करतात अशाच या दिवशी महापालिकेची यंत्रणा कमी प्रमाणात आणि कमी वेळ पाणीपुरवठा करणार आहे.