जिल्ह्यातील औद्योगिक भूखंडांचे दर कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:26 AM2021-02-06T04:26:04+5:302021-02-06T04:26:04+5:30
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची बैठक महामंडळाचे अध्यक्ष तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृह येथे झाली. बैठकीस ...
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची बैठक महामंडळाचे अध्यक्ष तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृह येथे झाली. बैठकीस उद्योग राज्यमंत्री अदिती तटकरे, उद्योग विभागाचे सचिव वेणुगोपाल रेड्डी, एमआयडीसीचे सीईओ डॉ.पी. अनबलगन आदी उपस्थित होते. यावेळी मालेगाव तालुक्यातील अंजग (टप्पा क्रमांक ३) येथील औद्योगिक भूखंडाचे दर कमी करण्यास मंजुरी देण्यात आली. १५८० रुपयांऐवजी आता केवळ ६०० रुपये दर ठेवण्यात आले आहेत. या निर्णयामुळे वस्रोद्योगाला गती मिळेल. याशिवाय नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी औद्योगिक वसाहतीतील भूखंडांचे दर दहा टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोविडच्या पार्श्वभूमीवर विविध उद्योगांकडे प्रलंबित असलेली महामंडळाची थकबाकी वसूल करण्यासाठी २५ टक्के सवलत देण्याचा निर्णय महामंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. औद्योगिक वसाहतीमधील कामगारांना आरोग्यविषयक सोयीसुविधा मिळाव्यात म्हणून इएसआय रुग्णालये उभारण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे दहा ठिकाणी भूखंड उपलब्ध करून देण्याचा निर्णय महामंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
महामंडळातील अग्निशमन केंद्रातील अधिकारी, कर्मचारी (वर्ग १ ते ४) यांना आपत्कालीनप्रसंगी कर्तव्य बजावताना वीरमरण आल्यास त्यांच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपये दिले जातील. तसेच त्यांना शहिदाचा दर्जा देण्याबाबत राज्य शासनास प्रस्ताव सादर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बैठकीत घेण्यात आला. भूखंडाचे दर कमी करणे आणि सिन्नरला इएसआय रुग्णाल उभारावे ही निमा-आयमाची मागणी पूर्ण होणार आहे.