लाल कांद्याला सर्वात नीचांकी भाव
By admin | Published: March 1, 2016 10:44 PM2016-03-01T22:44:52+5:302016-03-01T22:45:26+5:30
लासलगाव बाजार समिती : परराज्यातून आवक वाढल्याचा फटका
लासलगाव : येथील बाजार समितीत उन्हाळ कांद्याची थोड्या प्रमाणात आवक सुरू झालेली असली तरीही लाल कांद्याला गत दोन वर्षांच्या तुलनेत प्रतिक्विंटल नीचांकी सरासरी भाव मिळत आहे. गुजरात आणि कर्नाटक राज्यातूनही देशभरात कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने परिणामी लासलगाव कांद्याची मागणी कमी झाली आहे.
उन्हाळ कांद्याला सध्या सरासरी ६७५ रु पये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. हाच दर फेब्रुवारी २०१४मध्ये मिळाला होता. सध्या बाजार समितीत लेट खरीप कांद्याची आवक होत असून, या कांद्याची २०-२५ दिवस टिकवण क्षमता असल्याने शेतकऱ्यांना हा कांदा साठवता येत नाही. विकण्याशिवाय पर्याय नाही. मिळेल त्या दराने कांदा विकावा लागतो. सध्या जिल्ह्याात सर्व बाजार समितीत लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा अधिक झाल्याने भाव घसरत आहे.
लासलगाव बाजार समितीत दररोज १८ ते २१ हजार क्विंटल आवक होत आहे. गुजरात आणि कर्नाटक राज्यातील कांद्याची देशभरात आवक झाल्याने लासलगावच्या कांद्याला असलेली मागणी घटली आहे. चाकण आणि सोलापूर या भागात नवीन उन्हाळ कांदा येत असल्याने या कांद्याची टिकवण क्षमता जास्त असल्याने व्यापारी या कांद्याला पसंती देत आहेत. त्यामुळे येणाऱ्या दिवसात कांद्याचा भाव आणखी घसरेल, अशी शक्यता जाणकर व्यक्त करत आहेत. सध्या मिळत असलेल्या भावात उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरीवर्गात निराशा दिसत आहे. लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याची आवक सुरू झाली असून, रोज ५० ते १०० क्विंटलची आवक होत आहे.
मार्चअखेरपर्यंत आवक वाढेल, अशी माहिती देण्यात आली. आज लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याला किमान ४०० रुपये, सरासरी ७०० रुपये तर कमाल ८०० रु पये प्रतिक्विंटल भाव मिळाला, तर उन्हाळ कांद्याला किमान ७००, सरासरी ८५० तर कमाल ९७६ रुपये भाव
मिळाला. (वार्ताहर)