चूल पेटविता येईना, गॅस परवडेना! महागाईचा राक्षस जागा झाला; गॅस सिलिंडर ९५३ रुपयांना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 03:01 PM2022-03-28T15:01:44+5:302022-03-28T15:06:09+5:30
नाशिक - निवडणुका पार पडताच गॅस सिलिंडरच्या किमतीदेखील वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे मागील पाच महिन्यांपासून ९०३.५० रुपयांपर्यंत स्थिरावलेला घरगुती ...
नाशिक - निवडणुका पार पडताच गॅस सिलिंडरच्या किमतीदेखील वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे मागील पाच महिन्यांपासून ९०३.५० रुपयांपर्यंत स्थिरावलेला घरगुती गॅस सिलिंडर आता थेट ९५३.५० रुपयांपर्यंत गेला आहे. विशेष म्हणजे शासनाकडून यापूर्वी मिळत असलेली सबसिडी बंद करण्याविषयी शासनाने घोषणा केलेली नाही. मात्र, ती ग्राहकांच्या पदरातही पडत नाही. त्यामुळे आता ग्राहकांना घरगुती गॅस सिलिंडरसाठी तब्बल ९५३ रुपये ५० पैसे मोजावे लागत आहेत. घरगुती गॅस मागील दोन दिवसांपूर्वी जवळपास ५० रुपयांनी महागल्याने ९५३.५० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
किती ही महागाई?
महिना - गॅसचे दर
जानेवारी २०२१ - ६६७.५०
ऑक्टोबर २०२१ - ९०३.५०
मार्च २०२२ - ९५३.५०
सबसिडी नावालच
घरगुती गॅस सिलिंडरवर दिली जाणारी सबसिडी केवळ नावापुरतीच उरली असल्याचे मार्च २०२० पासून दिसून येत आहे. नाशिककर ग्राहकांच्या खात्यात मार्च २०२० मध्ये शेवटची सबसिडी २२१.९५ रुपयांची जमा झाली असून, त्यानंतर ग्राहकांना कोणतीही सबसिडी मिळालेली नाही.
चूल पेटविता येईना, गॅस परवडेना
शहरात फ्लॅटमध्ये राहणाऱ्या नागरिकांना चूल पेटविता येेेेेेेेेेत नाही, तर वसत्यांमध्येही धुरामुळे आपले व शेजारच्याचेही घर खराब होण्याच्या भीतीने चूल पेटविता येत नाही. अशा परिस्थितीत सातत्याने वाढणारे गॅस सिलिंडरचे भावही परवेडनासे झाल्याने शहर परिसरातील वस्त्यांमध्ये घराबाहेरील अंगणातून पुन्हा चुलीचा धूर दिसू लागला आहे.
केवळ गॅससाठी हजार रुपये कसे परवडतील?
सरकारने कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय सबसिडी बंद केली असून, बिगर सवलतीचा सिलिंडरही साडेनऊशे रुपयांहून अधिक महाग केला आहे. या सतत वाढत्या महागाईविरोधात कोणीही आवाज उठवत नसल्याने सरकारकडून सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे.
- रोहिनी साळवे, गृहिणी
सरकारने उज्ज्वला गॅस योजनेतून गॅस कनेक्शन दिले; परंतु सिलिंडर भरणेच परवडत नाही, आता तर सबसिडीही बंद केली आहे. त्यामुळे पुन्हा चूल पेटविण्याची वेळ आली आहे. उज्ज्वला योजनेतून मोफत गॅस घेणाऱ्या ग्राहकांना साडेनऊशे रुपयांचा सिलिंडर भरणे कसे परवडणार.
- अपूर्वा जाधव, गृहिणी