गीतकार हरेंद्र जाधव यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 01:39 AM2021-04-26T01:39:49+5:302021-04-26T01:40:08+5:30
प्रख्यात गीतकार आणि आंबेडकरी विचारांचे भाष्यकार हरेंद्र हिरामण जाधव यांचे मुंबईत निधन झाले, ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने आंबेडकरी प्रबोधनाच्या चळवळीची मोठी हानी झाली आहे.
नाशिक : प्रख्यात गीतकार आणि आंबेडकरी विचारांचे भाष्यकार हरेंद्र हिरामण जाधव यांचे मुंबईत निधन झाले, ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने आंबेडकरी प्रबोधनाच्या चळवळीची मोठी हानी झाली आहे.
काही वर्षांपूर्वी त्यांना पक्षाघाताचा झटका आला होता. त्यामुळे ते अंथरुणावरच होते. त्यातून ते सावरू शकले नाहीत. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. शनिवारी (दि.२४) मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली. मूळचे नाशिक जिल्ह्यातील ओझर मिग गावचे हरेंद्र जाधव हे पेशाने शिक्षक होते. त्यांचे वडील मुंबईत असल्याने त्यांचे आयुष्य मुंबईतच गेले. १६ फेब्रुवारी, १९३३ रोजी जन्मलेले हरेंद्र जाधव यांच्यावर लहानपणापासूनच आंबेडकरी जलशांचा प्रभाव होता.
जाधव यांनी बुद्धम् शरणंम् गच्छामी, धम्मंम् शरणंम् गच्छामी..., भीमाच्या धोरणाचा अभिमान पाहिजे, नेता असा आम्हाला गुणवान पाहिजे...., पाहा पाहा मंजुळा, हा माझ्या भीमरायाचा मळा…, तूच सुखकर्ता तूच दुखहर्ता, अवघ्या दिनांच्या नाथा…, माझ्या नवऱ्यानं सोडलीय दारू, बाई देव पावलाय गं..., आता तरी देवा मला पावशील का? सुख ज्याला म्हणतात ते दावशील का? आदी प्रसिद्ध गाणी त्यांनी लिहिलेली आहेत. आतापर्यंत त्यांच्या लेखणीतून शेकडो गीतरचना शब्दांकित झालेल्या आहेत. त्यापैकी त्यांची काही गाणी मुंबईतील सेंटर प्रकाशनाने नऊ भागांत पुस्तकरूपात प्रकाशित केली आहेत. लोकगायक रंजना शिंदे, श्रावण यशवंते, प्रल्हाद शिंदे, विठ्ठल उमप, आनंद शिंदे यांसह अजित कडकडे, सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल, बेला सुलाखे, साधना सरगम या प्रतिथयश गायकांनी आणि आंबेडकरी चळवळीतील अनेक शाहिरांनी त्यांची गाणी गायिली आहेत. शिक्षकी पेशात कार्यरत असलेले कवी हरेंद्र जाधव हे लोकशिक्षकही असल्याने, त्यांना आदराने ‘गुरुजी’ या उपाधीने संबोधले जात होते. एक जिज्ञासू, मितभाषी, संयमी, संवेदनशील, परंतु कवी मनाचा चिंतनशील सर्जक अशी त्यांची ओळख प्रचलित राहिलेली आहे. प्रसिद्ध लोककवी व शाहीर वामनदादा कर्डक यांच्याशी त्यांचा विशेष स्नेह होता. त्या स्नेहातूनच नाशिकमध्ये स्थापन झालेल्या ‘महाकवी वामनदादा कर्डक’ प्रतिष्ठानाशी त्यांचे अतूट नाते होते. समतावादी चळवळीशी बांधिलकी जपणारे, आंबेडकरी विचारांचा व चळवळीचा भाष्यकार असलेले कवी हरेंद्र जाधव यांच्या निधनाने आंबेडकरी प्रबोधनाच्या चळवळीची मोठी हानी झालेली आहे. त्यांच्यापश्चात पत्नी शकुंतला, मुलगी तारका असा परिवार आहे.