‘सुया घे गं, दाभण घे’चा गीतकार राहतोय कुडाच्या घरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:11 AM2021-07-18T04:11:00+5:302021-07-18T04:11:00+5:30
सटाणा तालुक्यातील देवळा गावचे रहिवासी असणारे पवार कुटुंबीय गेली ४७ वर्षांपासून कसारा येथे वास्तव्यास आहेत. आजमितीस त्यांचे वय ७६ ...
सटाणा तालुक्यातील देवळा गावचे रहिवासी असणारे पवार कुटुंबीय गेली ४७ वर्षांपासून कसारा येथे वास्तव्यास आहेत. आजमितीस त्यांचे वय ७६ वर्षांचे आहे. सन १९७४ साली त्यांनी तयार केलेले ‘बाई सुया घे ग, दाभण घे’ हे गीत रचले आणि प्रकाश पवार घराघरात पोहोचले. गायक प्रल्हाद शिंदे यांच्या घराण्यातील गायिका रंजना शिंदे यांनी आपल्या कर्णमधुर स्वरांनी हे गीत गायले व मधुकर पाठक यांनी त्या गीताला स्वरबद्ध केले. मात्र या गीताला जन्माला घालणारा अवलिया आजही कसाऱ्यासारख्या ठिकाणी कुडाच्या घरात राहतो आहे. काही वर्षांपूर्वी त्यांचे सुपुत्र देवदत्त पवार व सून यांचे निधन झाल्याने घरातील आठ सदस्यांची देखभाल करण्याची जबाबदारी या वयोवृद्ध लोककलावंतावर आली. तशा परिस्थितीवरही मात करत हा लोककलावंत कुणाकडेही हात न पसरता आपले स्वाभिमानी जीवन जगत आहे. प्रकाश पवार त्यांनी ‘चांडाळ चौकडी’ या चित्रपटासाठी ‘जीवन हे पाण्याचा बुडबुडा’ हे गीत लिहिले आहे. ‘झेंडा फडकस सतरा शिंगीना’ हे अहिराणी गीत त्याचप्रमाणे ‘भीमाच्या संसारी असं टिपूर चांदणं’, ‘चिल्या पिल्यांची भूक रमानं विकून मिटवली’, ही भीमगीते लिहिली तर महाराष्ट्राचे सुपरहिट गायक आनंद व मिलिंद शिंदे यांनी ही गीते स्वरबध्द केली आहेत. प्रकाश पवार यांची आतापर्यंत चार ते साडेचार हजार रेकॉर्ड ब्रेक लोकगीते, लग्नगीते, भक्तिगीते, भीमगीते लिहिली आहेत. प्रकाश पवार हे दलित साहित्यिक सुखी जीवनासाठी संघर्ष करताना दिसत असून त्यांच्या निवाऱ्यासाठी शासकीय कोट्यातून निवाऱ्याची सोय, कुटुंबांतील व्यक्तीला शासकीय नोकरी किंवा आर्थिक मदत मिळावी हीच माफक अपेक्षा कलाप्रेमींकडून व्यक्त करण्यात येत आहे. मोखावणे ग्रामपंचायतीकडून त्यांना रमाई घरकुल योजनेतून घर मंजूर केले खरे, पण त्याची अंमलबजावणी कुठे अडकली याचा मागमूस नाही.
कोट...
कोणताही लोककलावंत तारुण्यात आपली कला उमेदीने समाजापर्यंत पोहचविण्याचे काम करत असतो. उद्देश एकच आपल्या कलेतून समाजप्रबोधन व्हावं. तेव्हा समाजात त्याची वाहवा होते. मात्र कलावंताच्या उतारवयात त्यांच्याकडे समाजासह शासन दुर्लक्ष करते. मला शासनाकडून दोन हजारांइतपत तुटपुंजे मानधन मिळते. त्यातून कुटुंबाची गुजराण कशी होईल? साहित्य क्षेत्राची भरभराट व्हावी असे मनापासून वाटते. पण कलाकारांची परवड थांबवून त्यांना काम मिळावं. आर्थिक मदत मिळावी, हीच अपेक्षा.
- प्रकाश पवार, कवी.