‘ध’ चा ‘मा’ अन दहेगाव धरण फुटल्याच्या अफवेने पळापळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:19 AM2021-09-10T04:19:37+5:302021-09-10T04:19:37+5:30
नांदगाव शहराला पाणीपुरवठा करणारे ७२ द.ल.घ.फू. क्षमतेचे दहेगाव धरण शहरातून जाणाऱ्या लेंडी नदीवर १९७२ मध्ये बांधण्यात आले आहे. ते ...
नांदगाव शहराला पाणीपुरवठा करणारे ७२ द.ल.घ.फू. क्षमतेचे दहेगाव धरण शहरातून जाणाऱ्या लेंडी नदीवर १९७२ मध्ये बांधण्यात आले आहे. ते पूर्ण भरून वाहात असल्याने नदीला मोठा पूर आला होता. अशा वेळी ते फुटण्याच्या कल्पनेनेच लोक घाबरले. भोलेनगर, चांडक प्लॉट, गांधीनगर या नदी पात्राला खेटून असलेल्या वस्त्यामधले लोक जवळच्या डोंगरावर धावत गेले. दरम्यान ही वार्ता वणव्यासारखी नांदगाव शहरात पसरली. गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकमधील दुकानदारांनी शटर खाली ओढले व सर्व उंचावर असलेल्या भागाकडे धावले. ग्रामीण भागातून विचारणा व्हायला लागली. सर्वत्र घबराट निर्माण झाली. साकोरे गावात अंत्ययात्रेतील महिलांना तातडीने घराकडे पाठविण्यात आले.
-------------------------
एवढ्यात घाबरू नका...
दहेगाव धरणाचे पाणी आता शहरात घुसणार म्हणजे मोठे संकट....परवाच्या पुरातून वाचलो आणि आता दहेगाव धरणाच्या पाण्यात जलसमाधी मिळते की काय अशी भीती अनेकांना वाटू लागली. दोन तास शहरात धावपळ सुरू होती. प्रत्येकजण दुसऱ्याला तुला कळले का? असे विचारत सुटला होता. एवढ्यात घाबरू नका... काहीही फुटले नाही, अशी घोषणा करणारी गाडी फिरू लागली.
----------------------
खरा प्रकार असा होता....
बुधवारी दहेगावच्या वरच्या बाजूला असलेला मोरखेडी बंधारा फुटून त्याचे पाणी दहेगाव धरणात आल्याने ते ओव्हरफ्लो झाले होते. गुरुवारी सकाळी दहेगावच्या पुढे असलेल्या जुन्या माती बांधाला तडा गेल्याने तो फुटण्याची शक्यता निर्माण झाल्याच्या स्थितीचा ‘ध’चा‘मा’ झाला आणि दहेगाव धरणावर संशय घेतला गेला. नगराध्यक्ष राजेश कवडे यांनी हा खुलासा करून मातीच्या बंधाऱ्यासाठी जेसीबी मशीन पाठवल्याची माहिती दिली. या बंधाऱ्यावर प्रशासनाने लक्ष ठेवावे, अशी मागणी आहे. दरम्यान अफवा पसरवणाऱ्याचा शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.