नाशिकमध्ये भाजपकडून ‘माधव’ पॅटर्नची रणनीती, बहुजन समाज महायुतीबरोबर असल्याचे दाखवण्यासाठी प्रयत्न
By संजय पाठक | Published: April 2, 2024 12:04 PM2024-04-02T12:04:01+5:302024-04-02T12:05:17+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024: लाेकसभेची नाशिकची जागा कोणाला या विषयावर जोरदार रस्सीखेच सुरू असून, त्यातच छगन भुजबळ यांचे नाव अचानक चर्चेत आल्याने साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या गेल्या आहेत.
- संजय पाठक
नाशिक - लाेकसभेची नाशिकची जागा कोणाला या विषयावर जोरदार रस्सीखेच सुरू असून, त्यातच छगन भुजबळ यांचे नाव अचानक चर्चेत आल्याने साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या गेल्या आहेत. तथापि, गेल्या काही वर्षातील राजकारणाचा आढावा विशेषतः चळवळी लक्षात घेऊन भाजपने पुन्हा एकदा माधव (माळी-धनगर-वंजारी) या नीतीचा अवलंब सुरू केल्याची चर्चा होत आहे. ओबीसी समाजाला आकृष्ट करण्यासाठी ते महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
नाशिकची जागा शिंदे सेनेलाच मिळेल, अशी अटकळ होती. मात्र, हा भाजपचा पारंपरिक मतदारसंघ असल्याने ही जागा हवी म्हणून भाजपने आग्रह धरला. त्यातून शिंदे सेना फार प्रभावित झाली नाही. मात्र, गेल्या आठवड्यात अजित पवार गटाचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांचे नाव पुढे आल्याने शिंदे सेनेची झोप उडवली. आधी ठाण्याला मग मुंबईत वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंंदे यांच्यासमोर त्यांना शक्तिप्रदर्शन करावे लागले.
छगन भुजबळच कशामुळे?
- छगन भुजबळ आक्रमक नेते असून, ते पुन्हा दिल्लीत जाऊ शकतात.
-त्याचा अन्य राज्यातही कमी अधिक प्रमाणात लाभ होऊ शकतो, अशी एक शक्यता आहे.
- दुसरीकडे सध्या महाराष्ट्रातील आरक्षणाच्या राजकारणामुळे येवला मतदारसंघ तुलनेत तितकासा सोपा नाही, असेही मानले जाते.
पुन्हा गोडसे की भुजबळ ?
छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ यांचा तसा खासदार हेमंत गोडसे यांनी सलग पराभव करून दोन वेळा निवडून येण्याचा विक्रम नोंदवला. मात्र, भुजबळ यांचे नाव पुढे आल्याने त्यांच्यासह अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला असावा. विशेषत: भुजबळ यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना सहा महिन्यांपूर्वीच दिल्ली येथे महायुतीची बैठक झाली त्यावेळी आपल्याला लोकसभेच्या उमेदवारीसाठी विचारणा झाल्याचे सांगण्यात आले, असा दावा केला.
प्रत्येक जागेचे स्वतंत्र समीकरण
महायुतीला राज्यात ४५ प्लस आकडा पार करायचा आहे. त्यामुळे प्रत्येक जागेचे स्वतंत्र समीकरण मांडले जात आहे. पुन्हा एकदा भाजपकडून ‘माधव’ नीतीचा खेळ खेळला जात असल्याची
चर्चा आहे.
बहुजन समाजाचा पक्ष ठसवण्यासाठी भाजपने यापूर्वी अशाच प्रकारे गोपीनाथ मुंडे, ना. स. फरांदे, अण्णा डांगे यांच्यासारख्या नेत्यांना पुढे आणले.
आताही पंकजा मुंडे, महादेव जानकर यांना पुढे आणले आहेच, त्यात माळी समाजाचे प्रतिनिधित्व म्हणून भुजबळ यांचा चेहरा पुढे केला जात असल्याची चर्चा आहे.
सध्या राज्यातील आरक्षणांबाबतचे वाद बघता सर्व समाजच महायुतीबरोबर आहे हे ठसवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेही भुजबळ यांना पुढे केले जाऊ शकते, असे सांगितले जाते.