माधवराव गायकवाड यांचे जात, वर्गविहीन समाजाचे स्वप्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 01:31 AM2018-11-19T01:31:04+5:302018-11-19T01:32:12+5:30
ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक तथा माजी आमदार माधवराव गायकवाड यांचे जात व वर्गविहीन समाजाचे स्वप्न होते़ गायकवाड यांच्या प्रेरणादायी विचार व स्वप्नपूर्तीसाठी प्रामाणिक प्रयत्न करणे हीच त्यांना आदरांजली ठरणार असल्याचे प्रतिपादन आयटक नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता निकम यांनी केले़
नाशिक : ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक तथा माजी आमदार माधवराव गायकवाड यांचे जात व वर्गविहीन समाजाचे स्वप्न होते़ गायकवाड यांच्या प्रेरणादायी विचार व स्वप्नपूर्तीसाठी प्रामाणिक प्रयत्न करणे हीच त्यांना आदरांजली ठरणार असल्याचे प्रतिपादन आयटक नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता निकम यांनी केले़ भाकपा, आयटक व पुरोगामी पक्ष व संघटनांच्या वतीने द्वारका येथील वीज वर्कर्स फेडरेशन पतसंस्थेच्या सभागृहात आयोजित अभिवादन सभेत ते बोलत होते़ यावेळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार न करणाऱ्या शासनाच्या मान्यवरांनी शेलक्या शब्दात निषेध केला़
कम्युनिस्ट नेते राजू देसले यांनी आमदार गायकवाड यांनी स्वातंत्र्यासाठी भोगलेला तुरुंगवास, संयुक्त महाराष्ट्रासाठीचे योगदान, किसान सभेची उभारणी, भूमिहीन संघर्षमय वाटचाल सांगितली़ तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेतून आमदार, मनमाड नगराध्यक्ष, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपदाच्या कालावधित केलेल्या कार्याबाबत माहिती दिली़
यावेळी ज्योती नटराजन, शिवाजी शिंदे, करुणासागर पगारे, डॉ़संंजय जाधव, नामदेव बोराडे, भाऊसाहेब शिंदे यांच्यासह मान्यवरांनी गायकवाड यांना अभिवादन करून आठवणी जागविल्या़ यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्ष, आयटक, तसेच पुरोगामी पक्ष व संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते़
शासनाचा निषेध
ज्येष्ठ नेते श्रीधर व्यवहारे यांनी स्वातंत्र्यसैनिक गायकवाड यांनी नाशिक जिल्ह्याला परिवर्तनवादी चळवळीचे केंद्र बनविल्याचे सांगितले़ राम गायखे, मनीष बस्ते यांनी गायकवाड यांचे कार्य व आठवणींना उजाळा दिला़, तर माजी नगरसेवक तानाजी जायभावे यांनी शासनाने शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले नसले तरी मनमाडकरांनी शहर बंद ठेवून दिलेली आदरांजली हा त्यांच्या कार्याचा गौरव असल्याचे सांगत शासनाचा निषेध केला़