नाशिकमध्येही भाजपाला 'महाविकास' पडली महागात; शिवसेनेनं जागा राखली, राष्ट्रवादीनं 'कमावली'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 11:53 AM2020-01-10T11:53:01+5:302020-01-10T11:56:21+5:30
नाशिक महापालिकेच्या दोन जागांसाठी आज झालेल्या पोटनिवडणकीत भाजपाला धक्का बसला असून महाविकास आघाडीचे अनुक्रमे मधुकर जाधव आणि जगदीश पवार हे निवडून आले.
नाशिक-नाशिक महापालिकेच्या दोन जागांसाठी आज झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का बसला असून महाविकास आघाडीचे उमेदवार मधुकर जाधव आणि जगदीश पवार हे निवडून आले. नाशिक महापालिकेत भाजपाची सत्ता आणण्यात माजी मंत्री गिरीश महाजन यांचा मोठा वाटा होता. मात्र, राज्यात सत्तांतर होताच नाशिकमधील राजकीय हवाही बदलू लागल्याचं चित्र असून महाजन यांच्यासाठीही हा धक्का मानला जातोय.
नाशिक महापालिकेच्या नाशिकरोड विभागातील प्रभाग क्रमांक २२ च्या पोटनिवडणुकीसाठी आज झालेल्या मतदानात राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार जगदीश पवार ४,९१३ मते मिळाली तर पराभूत भाजपाच्या विशाखा शिरसाठ यांना १,५२५ मते मिळाली. यामुळे पवार यांचा ३,३८८ मतांनी दणदणीत विजय झाला.
सिडको विभागात प्रभाग क्रमांक २८ मधून शिवसेनेचे मधुकर जाधव हे देखील २,८१२ मतांच्या दणदणीत आघाडीने विजयी झाले आहेत. या जाधव यांना ५,८६५ मते मिळाली तर मनसेचे दिलीप दातीर यांना ३,०५३ मते मिळाली आहेत.
नाशिकरोड विभागातून भाजपाच्या सरोज आहिरे यांनी विधानसभा निवडणूक राष्ट्रवादीकडून लढविण्यासाठी भाजपा नगरसेवकपदाचा राजीनामा दिला होता. तर सिडको मधून देखील शिवसेनेचे नगरसेवक असलेल्या दिलीप दातीर यांनी मनसेकडून निवडणूक लढविण्यासाठी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. नाशिकरोडच्या सरोज आहिरे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी आपल्या प्रभागातून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला निवडून आणल्याने महापालिकेत भाजपाची एक जागा घटली आहे तर दुसरीकडे मधुकर जाधव निवडून आल्याने शिवसेनेने जागा राखली आहे. दिलीप दातीर विधानसभा निवडणुकीपाठोपाठ नगरसेवकपदाची निवडणूक हरल्याने त्यांची अवस्था बिकट झाली आहे.