सरस्वतीच्या दारातच ‘मधुशाळा’
By Admin | Published: December 14, 2015 11:52 PM2015-12-14T23:52:31+5:302015-12-14T23:52:31+5:30
सरस्वतीच्या दारातच ‘मधुशाळा’
सिडको :विद्या विनयन शोभते’ असे वाक्य शाळेच्या भिंतीवर रेखाटलेल्या महापालिकेच्या गणेश चौकातील हायस्कूलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना शाळेत प्रवेश करतानाच मद्याच्या फुटलेल्या बाटल्यांचा कच दिसतो. यावरून या शाळेची सुरक्षितता किती रामभरोसे आहे याचे चित्र दर सुटीच्या दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावर बघावयास मिळते. अशी परिस्थिती असतानाही या शाळेकडे अद्यापही महापालिकेच्या कारभाऱ्यांनी याचे गांभीर्याने दखल घेतली नसल्याचे दिसत आहे.
सिडकोतील गणेश चौकात मनपा हायस्कूल आहे. या शाळेत सकाळी व दुपार असे वर्ग भरतात, परंतु या शाळेची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. शाळेच्या संपूर्ण आवारात कचरा साचलेला असून, गाजरगवत वाढलेले आहे. सकाळी अंगवाडीच्या तीन तुकड्या भरतात व दुपारी पाचवी ते दहावीच्या जेमतेम तुकड्या भरतात. सोमवारी सकाळी अंगणवाडीच्या मुलांना त्यांचे पालक शाळेत घेऊन आले की शाळेच्या प्रवेश दारातच मद्यपींनी मद्याच्या बाटल्या फोडून परिसरात काचा टाकलेल्या दिसतात. या काचा जर शाळेतील बालगोपाळांच्या पायात शिरल्या तर त्यांना इजा होऊ शकते. यामुळे शाळेत मुलांना सोडविण्यासाठी आलेल्या पालकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. शाळेला रविवार व इतर सार्वजनिक सुटीच्या दिवसानंतर दुसऱ्या दिवशी शाळेत मद्याच्या बाटल्या दिसून येतात. सोमवार (दि १४)रोजी असाच प्रकार उघडकीस आला आणि शाळेत मुलांना सोडण्यासाठी आलेल्या पालकांनी प्रवेश द्वारावर मद्याच्या बाटल्या फोडलेल्या पाहून शाळेच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला. शाळेचे मुख्य प्रवेशद्वार तुटलेले असून, शाळेत रात्रीच्या वेळी सुरक्षारक्षकच नसल्याने शाळेच्या मैदानात रात्री मद्याच्या पार्ट्या होतात, असे परिसरातील नागरिकांनी सांगितले. तसेच शाळेच्या मैदानात रात्रीच्या वेळेस टवाळखोर गर्दी करून याच मैदानात मद्यप्राशन करून सिडको तसेच परिसरात धिंगाणा घालण्याचा प्रकारही या टवाळखोरांकडून केला जात असल्याचेही नागरिकांनी सांगितले.
शाळेच्या आवारात दोन ते तीन खोल्या आहेत. या खोल्यांमध्ये मनपा कर्मचारी राहत असल्याचे सांगण्यात येत असले तरी या ठिकाणी सदर कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून फुकट लाईट वापरत आहे. तसेच शाळेच्या आवारात मुके जनावरही त्यांनी पाळल्याचे शाळेच्या
वतीने सांगण्यात आले. एकूणच संपूर्ण शाळाच
रामभरोसे झाली असून, याबाबत मनपा आयुक्तांनीच
लक्ष घालण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.