कल्याणपूर यांच्या तबल्याची जादू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 12:06 AM2019-05-27T00:06:42+5:302019-05-27T00:06:57+5:30
ज्येष्ठ तबलावादक झाकीर हुसेन यांचे शिष्य आदित्य कल्याणपूर यांच्या ताल तीनतालातील उठाण, पेशकार, कायदे, रेले यांसह पंजाब घराण्याच्या विविध बंदिशींच्या तबलावादनाची जादू नाशिककरांना अनुभवायला मिळाली.
नाशिक : ज्येष्ठ तबलावादक झाकीर हुसेन यांचे शिष्य आदित्य कल्याणपूर यांच्या ताल तीनतालातील उठाण, पेशकार, कायदे, रेले यांसह पंजाब घराण्याच्या विविध बंदिशींच्या तबलावादनाची जादू नाशिककरांना अनुभवायला मिळाली. त्याचप्रमाणे पवार अकादमीचे ज्येष्ठ शिष्य सुजीत काळे यांच्या ताल त्रितालातील तबलावादन आणि सुभाष दसककर यांच्या संवदिनीच्या सुरांनीही नाशिककरांची मने जिंकली.
पवार तबला अकादमी व एसडब्ल्यूएस फायनान्शियल सोल्युशनतर्फे थोरात सभागृहात ‘तालाभिषेक-२०१९’ अंतर्गत गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या द्वितीय पुष्पाचा रविवारी (दि.२६) समारोप झाला. तबलाभिषेक महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी प्रारंभी दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी सारडा उद्योग समूहाचे संचालक श्रीरंग सारडा, माधुरी शर्मा, नितीन पवार आदी उपस्थित होते. महोत्सवाच्या समारोप सोहळ्यात सुरुवातीला सुजीत काळे यांनी त्रितालातील पेशकार, कायदे, रेले, तिहाई, गत, तुकडेस चलन पारंपरिक व घराणेदार बंदिशी चक्रदार आदी तबलाविष्कारांचे सादरीकरण करीत रसिकांची वाहवा मिळविली. त्यांना संवादिनीवर ज्ञानेश्वर कासार यांनी साथसंगत केली. त्यानंतर ख्यातनाम संवादिनीवादक सुभाष दसककर यांनी राग चारुकेशीमध्ये आलाप, जोड व झाला, विलंबित तीनतालातील गत आणि द्रुत तीनतालातील बंदिश सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. तर ज्येष्ठ तबलावादक झाकिर हुसेन यांचे शिष्य आदित्य कल्याणपूर यांच्या ताल तीनतालातील उठाण, पेशकार, कायदे, रेले यांसह पंजाब घराण्याच्या विविध बंदिशींच्या सादरीकरणाने दाद मिळविली. त्यांना प्रशांत महाबळ यांनी संवादिनीवर साथसंगत केली. दरम्यान, नृत्यांगना सुुमुधी अथनी यांनी कथक नृत्यशैलीत व आशिष रानडे यांनी शास्त्रीय गायनात पीएच.डी. प्राप्त केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक रघुवीर अधिकारी यांनी केले. तर सुनेत्रा मांडवगणे- महाजन यांनी सूत्रसंचालन केले.