द्राक्ष बागांमध्ये शेकोट्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 03:28 PM2018-12-28T15:28:18+5:302018-12-28T15:28:30+5:30
सायखेडा : निफाड तालुक्यात सलग चौथ्या दिवशी चार अंश सेल्सियस तापमान असल्याने वाढत्या थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावला आहे.
सायखेडा : निफाड तालुक्यात सलग चौथ्या दिवशी चार अंश सेल्सियस तापमान असल्याने वाढत्या थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावला आहे. अति प्रमाणात थंडी असल्याने मन्यांना तडे जात आहे. हाती आलेला बाग वाचविण्यासाठी शेतकºयांची धडपड सुरू आहे. आपल्या बागेत उष्णता निर्माण व्हावी, आर्द्रतेचे प्रमाण कमी होऊन मन्यांना नरमपणा यावा यासाठी शेतात शेकोटे पेटवली जात आहे. धूर आणि उष्णतेच्या झळा घडांना लागल्यास घड सैल होऊन तडे जाणार नाही असे अभ्यासकांचे मत असल्याने मध्यरात्री, पहाटे बागेत शेकोट्या पेटलेल्या दिसत आहे. राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद निफाड तालुक्यात झाली. गोदावरी आणि कादवा नदीचे खोरे, पाणथळ शिवार, हिरवीगार शेत, तालुक्यातून वाहणारे कालवे ,उपसा सिंचन प्रकल्प यामुळे तालुक्यातील ऐंशी टक्के भूभाग ओलिता खाली येत असल्याने बºयाचवेळा थंडी मोठ्या प्रमाणावर असते. यंदा मात्र थंडीने नीचांक गाठला आहे. वाढत्या थंडीचा फटका सर्वाधिक द्राक्ष उत्पादक शेतकºयांना बसत आहे. द्राक्ष हे वर्षातून एकदा घेतले जाणारे पीक आहे. शिवाय इतर सर्व पिकांपेक्षा जास्त खर्च होतो. भांडवल जास्त लागते त्यामुळे पीक चांगले यावे आणि आर्थिक फायदा व्हावा यासाठी शेतकरी मोठी कसरत करत असतो. सोने गहाण ठेऊन पिकासाठी भांडवल उभे करतो. अनेक पतपेढी, बँक यांचे शेती कर्ज काढून पीक जोमात आणतो मात्र हाती आलेले पीक कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटांनी वाया जाते. शेतकरी आर्थिक संकटांचा सामना करत पीक वाचविण्याचा प्रयत्न सुरू ठेवतो. थंडीचा परिणाम जाणवू लागला आहे, मन्यांना तडे जात आहे. शिवाय भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे शेतात धूर करून थंडी आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न शेतकरी करतांना दिसत आहे. अनेक शेतकरी पहाटे बागेला ठिबकद्वारे पाणी देऊन झाडांमध्ये उष्णता निर्माण करत आहे.