महादेवपूर-डंबाळेवाडी- दुगाव रस्ता मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 01:09 AM2019-01-08T01:09:55+5:302019-01-08T01:10:14+5:30
दोन शेतकऱ्यांच्या वादात रखडलेला शिवरस्ता अखेर २५ वर्षांनंतर मुक्त झाला आहे. या रस्त्यामुळे शेतकरी आणि गावाच्या विकासाचा मार्ग प्रशस्त होणार असून, यासाठी प्रयत्न करणाºया महादेवपूरच्या सरपंचाची मध्यस्थी फलद्रुप ठरली आहे.
गंगापूररोड : दोन शेतकऱ्यांच्या वादात रखडलेला शिवरस्ता अखेर २५ वर्षांनंतर मुक्त झाला आहे. या रस्त्यामुळे शेतकरी आणि गावाच्या विकासाचा मार्ग प्रशस्त होणार असून, यासाठी प्रयत्न करणाºया महादेवपूरच्या सरपंचाची मध्यस्थी फलद्रुप ठरली आहे. शेतकरी एकत्र आले तर गावाचे चित्र बदलू शकतात, हे सिद्ध करून दाखविणारी ही घटना आहे. नुकतेच महादेवपूर गावचे सरपंच झालेले विलास सांडखोरे यांनी दोन शेतकºयांच्या वादामुळे रखडलेला शिवरस्ता सामंजस्याने मोकळा करवून घेतला आहे. या रस्त्यासंदर्भात दोन शेतकºयांमध्ये टोकाचा वाद असल्याने गावाच्या विकासाला अडचणदेखील निर्माण झाली होती. त्यामुळे विकासाची कामेदेखील खोळंबली होती. अखेर गेल्या २५ वर्षांपासूनचा वाद संपुष्टात आल्याने परिसरातील शेतकरी व गावांना त्याचा फायदा होणार असल्याचे सरपंचांनी सांगितले. गावातील सरपंच विलास सांडखोरे आणि ग्रामपंचायत सदस्य अलका कैलास डावरे यांनी ही बाब ओळखून रस्त्याचा वाद मिटविण्यासाठी प्रयत्न केले.
शेतकºयांचे आर्थिक नुकसान टळणार
महादेवपूर गावातील शिवार रस्ता गेल्या २५ वर्षांपासून भिजत प्रलंबित होता. या रस्त्यामुळे दोन गावांतील अंतर वाढले होते. सदर रस्ता मोकळा व्हावा, असे बहुतेकांना वाटत होते. यासाठी अनेकदा प्रयत्नदेखील झाले. मात्र रस्ता अडवून बसलेल्यांना सांगायचे कुणी? उगाच वादास निमंत्रण नको अशी भीती ग्रामस्थांनादेखील वाटत होती. येथून जाणाºया शेतकºयांना आपला माल बाजारात घेऊन जाताना मोठा चक्कर मारावा लागत असल्याने आर्थिक नुकसान आणि वेळेचा दुरुपयोगदेखील होत होता.
कैलास डावरे व राजू डावरे यांनी आपल्या मालकीची जमीन रस्त्याच्या कामासाठी खुली करून दिली. दरम्यान, त्याठिकाणी मोठा रास्ता तयार झाल्यास परिसरातील १०० ते १५० शेतकºयांना त्याचा लाभ होणार आहे. परिणामी गावाचा विकास होणार असल्याने या रस्त्यात ज्या शेतकºयांची जमीन जाणार आहे. त्यांना एकत्र बसवून त्यांच्यातील गैरसमज काढून दोन गावांतील अंतर आणि परिसरातील शेतकºयांचा प्रश्न कशा पद्धतीने सुटेल याविषयी पटवून दिले. रस्ता मोकळा झाल्याने परिसरातील शेतकºयांनी सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करून आभार मानले.