मासेमारी ठेक्यास महागठबंधन आघाडीचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:14 AM2021-05-11T04:14:29+5:302021-05-11T04:14:29+5:30
मालेगाव: शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तळवाडे तलावाचे पाणी दाभाडीला देण्याची मागणी रेटणारे आता या तलावातून मासेमारीचा ठेका देण्याचा प्रयत्न ...
मालेगाव: शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तळवाडे तलावाचे पाणी दाभाडीला देण्याची मागणी रेटणारे आता या तलावातून मासेमारीचा ठेका देण्याचा प्रयत्न करत आहेत. मासेमारी ठेक्यास महागठबंधन आघाडीचा विराेध असून, कुठल्याही परिस्थितीत ठेका मंजूर हाेऊ देणार नाही, असा इशारा नगरसेवक मुस्तकिम डिग्निटी यांनी दिला.
येथील ऊर्दू मीडिया सेंटर येथे आयाेजित पत्रकार परिषदेत डिग्निटी यांनी महागठबंधन आघाडीची भूमिका मांडली. मालेगावची तहान भागत नसताना तळवाडेचे पाणी दाभाडीला देण्याचा घाट घातला गेला. कृषिमंत्री दादा भुसे यांच्या दबावाला बळी पडून सत्ताधारी काॅंग्रेस पक्ष शहराच्या विराेधात निर्णय घेत आहे. गेल्या वर्षी मेध्यमध्ये बाधितांचा आकडा वाढत असताना सामान्य रुग्णालयात विशेष काेविड सेंटर सुरु झाले नाही. आता ग्रामीण भागात रुग्ण वाढत असताना तातडीने शंभर बेडचे सेंटर कार्यान्वित करण्यात आले. भुसे यांचा महापालिकेच्या कारभारात अनावश्यक हस्तक्षेप वाढत आहे. मर्जीतील आयुक्त बसवून मनाविरुध्द काम करणाऱ्या उपायुक्तांची हेतुपुरस्सर बदली केली. सत्तेचा गैरवापर करुन मनमानी कारभार सुरु असल्याचा आराेप डिग्निटी यांनी केला. तळवाडे तलावातून मासेमारीचा ठेका देण्याच्या हालचाली केल्या जात आहेत. मासेमारी करताना त्यात विषारी द्रव्याचा वापर केला जाताे. यामुळे पाणी दूषित हाेण्याचा अधिक धाेका असताे. विषारी द्रव्यामुळे गिरणात हजाराे मासे मृतावस्थेत आढळून आले हाेते. या द्रव्याचा मानवी आराेग्यावर विपरित परिणाम हाेताे. याप्रसंगी अतहर हुसैन अश्रफी, नगरसेवक मन्सूर शब्बीर, बाकी राशनवाला. साेहेल अब्दुल करीम, सलीम सय्यद आदी उपस्थित हाेते.
----------------------
जनतेच्या आरोग्यास धोका
महापालिकेच्या कामकाजात कृषिमंत्री दादा भुसे यांचा हस्तक्षेप वाढत चालला आहे. भुसे यांच्या मर्जीने आयुक्त भालचंद्र गाेसावींची नियुक्ती झाली, तर उपायुक्त नितीन कापडणीस यांची दबावामुळे तडकाफडकी बदली करण्यात आल्याचा आरोप नगरसेवक मुस्तकिम डिग्निटी यांनी केला. तळवाडे तलाव छाेटा असून, ताे केवळ पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित आहे. त्यातून मासेमारी झाल्यास पाणी पिण्यायाेग्य राहणार नाही. चाेरटी मासेमारी करण्याच्या उद्देशाने विषारी द्रव्याचा घातक वापर हाेऊ शकताे. महापालिका प्रशासनाने असा कुठल्याही प्रकारचा ठेका मंजूर करू नये. जनतेच्या आराेग्यास बाधा निर्माण करणारा निर्णय घेतल्यास त्याला विराेध करू, असे डिग्निटी यांनी स्पष्ट केले.