महाजन बंधूंची ‘सी टू स्काय’ मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 12:10 AM2019-03-16T00:10:08+5:302019-03-16T00:30:44+5:30
हृदयविकाराचा झटका आल्यानंतर प्रथमोपचार म्हणून सीपीआर (जीवन संजीवनी) तंत्राची जगभर जनजागृती करण्यासाठी महाजन बंधू फाउंडेशनच्या वतीने दि. ३१ पासून मुंबई ते काठमांडू पर्यंत ‘सी टू स्काय’ या साहसी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
सातपूर : हृदयविकाराचा झटका आल्यानंतर प्रथमोपचार म्हणून सीपीआर (जीवन संजीवनी) तंत्राची जगभर जनजागृती करण्यासाठी महाजन बंधू फाउंडेशनच्या वतीने दि. ३१ पासून मुंबई ते काठमांडू पर्यंत ‘सी टू स्काय’ या साहसी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन महाजन बंधूंनी पत्रकार परिषदेद्वारे केले आहे.
सातपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. महाजन बंधूंनी सांगितले की, सीपीआर तंत्राची जनजागृती करणे, जीवन वाचविण्यासाठी तज्ज्ञ प्रशिक्षित करणे, जीवन संजीवनी उपक्र माची माहिती देण्यासाठी दि. ३१ मार्चपासून मुंबई (समुद्र सपाटीपासून) ते काठमांडूपर्यंत सायकलिंग, ट्रेकिंग (एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत), गिर्यारोहण (माउंट एव्हरेस्ट सर करणे २९ हजार २८ फूट स्काय लेव्हल) अशा ‘सी टू स्काय’ या अनोख्या आणि साहसी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
जगभरातून आलेल्या गिर्यारोहकांना एव्हरेस्ट बेस कॅम्प काठमांडू येथे जीवन संजीवनीचे प्रात्यक्षिके दाखविले जाणार आहेत. यसाठी सहभागी होणाऱ्या सायकलपटूंची तयारी करून घेण्यात येत आहे. या मोहिमेत सहभागी होणाऱ्यांनी आपली नावे नोंदणी करावीत, असे आवाहन यावेळी करण्यात आले. या पत्रकार परिषदेत महाजन बंधूंसह नाशिक सायकलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीणकुमार खाबिया, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. आवेश पलोड, कल्पतरू फाउंडेशनचे डॉ. शरद पाटील, गुरु देवसिंग बिर्दी आदी उपस्थित होते.
दि.३१ मार्च रोजी गेट वे आॅफ इंडिया सरदार तारासिंग उद्यान मुलुंड येथून मोहिमेला प्रारंभ होईल. तेथून नाशिक, धुळे, इंदूर, भोपाळ, कानपूर, लखनऊ, नेपाळ, काठमांडू आणि पुढे एव्हरेस्ट बेस कॅम्पला जाण्यासाठी दि.८ एप्रिलपासून ट्रेकिंगला सुरुवात केली जाणार आहे. नऊ दिवसांत एव्हरेस्ट बेस कॅम्प सर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.