शंभर रॅलींच्या माध्यमातून स्वच्छतेचा महाजागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 01:15 AM2019-01-13T01:15:31+5:302019-01-13T01:15:58+5:30
स्वच्छतेच्या मोहिमेला उत्तेजन देण्यासाठी आणि पूर्ण शहरामध्ये स्वच्छतेचा जागर करण्यासाठी महास्वच्छता अभियानांतर्गत नाशिक शहरात शनिवारी १०० पेक्षा अधिक जनजागृती रॅलींचे विविध शाळा परिसरातून आयोजन करण्यात आले.
नाशिक : स्वच्छतेच्या मोहिमेला उत्तेजन देण्यासाठी आणि पूर्ण शहरामध्ये स्वच्छतेचा जागर करण्यासाठी महास्वच्छता अभियानांतर्गत नाशिक शहरात शनिवारी १०० पेक्षा अधिक जनजागृती रॅलींचे विविध शाळा परिसरातून आयोजन करण्यात आले.
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या फिल्ड आउटरीच ब्यूरोतर्फे शिक्षण विभागाच्या सहकार्याने महास्वच्छता या अभियानाचे आयोजन करण्यात आले. अभियानाचा शुभारंभ गंगापूररोड येथील मराठा हायस्कूल येथे करण्यात आला. यावेळी जि. प. शिक्षण सभापती यतिंद्र पगार, के.टी.एच.एम. कॉलेजचे प्राचार्य डॉ. वी.बी. गायकवाड, क्षेत्रीय प्रचार अधिकारी पराग मांदळे, जिल्हा माहिती अधिकारी किरण मोघे, जि. प. माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, मविप्र समाज संस्थेचे शिक्षणाधिकारी एस. के. शिंदे, जि. प.चे उपशिक्षणाधिकारी के. डी. मोरे, विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. डी. शिंदे, पर्यवक्षेक एस. बी. सोमवंशी, एन. एफ. बोराडे, ए. बी. ठुबे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पगार म्हणाले, देशाला समृद्ध करण्यासाठी स्वच्छता महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांनी वैयक्तिक स्वच्छतेबरोबर परिसर स्वच्छतेकडेही लक्ष द्यावे. ग्रामीण भागात शौचालयाच्या वापराबाबत प्रबोधन करण्यासाठी विद्यार्थ्यांचे योगदान महत्त्वाचे ठरेल, असे त्यांनी सांगितले.
शासन शौचालयासाठी निधी देत असून, शौचालयाचा वापर योग्यपद्धतीने करणे प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. तत्पूर्वी रिजनल आउटरीच ब्यूरोच्या कला पथकाने स्वच्छतेवर आधारित पथनाट्य सादर केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शालेय परिसर स्वच्छतेच्या उपक्रमात मोठ्या उत्साहाने भाग घेतला.