उद्यापासून मऱ्हळला यात्रोत्सव

By Admin | Published: February 10, 2017 12:04 AM2017-02-10T00:04:12+5:302017-02-10T00:04:24+5:30

शनिवारपासून प्रारंभ : चार दिवसीय यात्रेत लाखो भाविक लावणार हजेरी

The mahalala yatra from tomorrow | उद्यापासून मऱ्हळला यात्रोत्सव

उद्यापासून मऱ्हळला यात्रोत्सव

googlenewsNext


 निऱ्हाळे : प्रतिजेजुरी म्हणून लौकिकास पावलेल्या मऱ्हळ येथील खंडेराव महाराजांच्या चार दिवसीय यात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. शनिवारपासून (दि. ११) प्रारंभ होणाऱ्या यात्रोत्सवात सुमारे लाखभर भाविक ‘येळकोट येळकोट, जय मल्हार’चा जयघोष व खोबरे-भंडाऱ्याची उधळण करीत दर्शनासाठी हजेरी लावतात.
प्रतिजेजुरी म्हणून ओळख असलेल्या खंडोबा महाराज यात्रेसाठी राज्यभरातील भाविक मिळेल त्या वाहनाने दाखल होत आहेत. जेजुरीस जाण्यापूर्वी मंदिरात नारळ व बेल भंडारा अर्पण करण्याची प्रथा आहे. परिसरातील जागृत देवस्थान म्हणून येथे महत्त्व प्राप्त झालेले आहे. यात्रा समिती व ग्रामस्थांनी यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे. देवराम महाराज हायस्कूल व प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी मंदिर परिसर स्वच्छ केला आहे. विद्युत रोषणाई व पताकांनी मंदिर परिसर सजविण्यात आला आहे.
शनिवारी रात्री पांगरी येथील मानाचा रथ मंदिरासमोर आल्यानंतर खंडेराव महाराज पालखी व देवाच्या मुखवट्याची विधिवत पूजा करण्यात येते. सामुदायिक आरती झाल्यानंतर रथाची गावातून वाजत-गाजत मिरणूक काढण्यात येते. ‘जय मल्हार’च्या जयघोषात आणि खोबरे-भंडाऱ्याच्या उधळणीत परिसर न्हाऊन निघतो. हातात दिवटी-बुधली घेऊन पुढे चालणाऱ्या भाविकांच्या उपस्थितीत रथ व खंडेराव महाराजांची पालखी निऱ्हाळे रस्त्यावरील महाल बागेत नेण्यात येते. याप्रसंगी निऱ्हाळे, कणकोरी, माळवाडी, सुरेगाव, खंबाळे, पांगरी, वावी, निमोण, नांदूरशिंगोटे, दोडी, सायखेडा, घोटेवाडी, सिन्नर, नाशिक, अहमदनगर येथील भाविक आपापले देव महाल बागेत भेटीसाठी आणतात. रात्री १२ वाजेपासून पहाटे ६ वाजेपर्यंत नामवंत वाघे-मुरळीचा जागरणाचा कार्यक्रम संपन्न होतो. यावेळी अनंतयोग देव्हाऱ्याचे विधिवत पूजन करण्यात येते.
रविवारी सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत विविध धार्मिक पार पडणार आहेत. त्यानंतर दिवसभर नवसपूर्तीचे कार्यक्रम होतात. त्यानंतर मनोरंजनासाठी तुकाराम खेडकरसह पांडुरंग मुळे यांच्या लोकनाट्य तमाशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी महाल बागेत तमाशा कलावंतांच्या हजेरीचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर दिवसभर भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. दुपारी ३ वाजता होणाऱ्या कुस्त्यांच्या दंगलीत राज्यभरातील नामवंत मल्ल सहभागी होणार आहेत.
यात्राकाळात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी वावी पोलीसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी सिन्नर आगाराची ‘सिन्नर-निऱ्हाळे’ बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय यात्राकाळात पांगरी ते मऱ्हळ अशा बसफेऱ्या दिवसभर सुरु राहणार आहेत. यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी सरपंच भाऊसाहेब बोडके, उपसरपंच संगीता बर्डे, पोलीस पाटील संदीप कुटे, रमेश कुटे, वसंत कुटे, बबन कुटे, भगीरथ लांडगे, दत्तू सांगळे, जयराम सांगळे, चंद्रकांत कुटे, सुदाम कुटे, रंगनाथ सगर, बाळू कुटे, शरद लांडगे, सुदाम सगर यांच्यासह जय मल्हार मित्रमंडळ व ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत. (वार्ताहर)

Web Title: The mahalala yatra from tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.