सर्व तीर्थंकरांच्या जयघोषात महामस्तकाभिषेक
By admin | Published: February 18, 2016 11:39 PM2016-02-18T23:39:11+5:302016-02-18T23:39:59+5:30
मांगीतुंगी : भगवान वृषभदेव यांच्या विशालकाय मूर्तीवर विविध रस, पंचामृत, दुग्धाभिषेक
नाशिक : ‘बोलो भगवान वृषभनाथकी जय, बोलो आदिनाथकी जय’, ‘सर्व तीर्थंकरकी जय’ अशा जयघोषात आणि आचार्यगण, मुनीवर, हजारो संत-महात्मे आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीत मांगीतुंगी येथील भगवान वृषभदेवांच्या विशालकाय मूर्तीचा महामस्तकाभिषेक सोहळ्याला उत्साहात सुरुवात झाली.
मांगीतुंगी येथील भगवान वृषभदेव यांच्या १०८ फुटी विशालकाय मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा गेल्या सात दिवसांपासून सुरू असून, गुरुवारी (दि.१८) सकाळी ११ वा. महामस्तकाभिषेक सोहळ्याला हर्षाेल्हासात प्रारंभ झाला. गणिनीप्रमुख ज्ञानमती माताजी, चंदनामती माताजी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रवींद्रकीर्ती स्वामी यांच्या कुशल नेतृत्वाखाली या सोहळ्याला सुरुवात झाली. याप्रसंगी आचार्य अनेकांतसागर महाराज, आचार्य पद्मनंदजी
महाराज, आचार्य गुप्तीनंदजी महाराज, आचार्य धर्मनंदजी महाराज, आचार्य बालाचार्य जीनसेन महाराज, आचार्य नितानंद सागर महाराज, आचार्य देवसेन महाराज आदि प्रमुख आचार्यांसह विविध जैन संत-महात्म्यांनी धर्मशास्त्रानुसार मंत्रोचारण करीत असतानाच इंद्र-इंद्राणी बनलेल्या साधन भक्तांनी भगवान वृषभदेवांच्या विशालकाय मूर्तीवर पंचामृत अभिषेकाबरोबरच नारळ पाणी, इच्छुकरस (उसाचा रस), दूध, दही, तूप, डाळींब रस, मोसंबी रस, हळदीरस, केशरपाणी आदिंसह विविध औषधी अर्कांनी अभिषेक करण्यात आला. यावेळी आयोजक समिती महामंत्री डॉ. पन्नालाल पापडीवाल, मंत्री सी.आर. पाटील, विजयकुमार जैन, भूषण कासलीवाल, जीवन प्रकाश जैन यांच्यासह लाखो भाविक या सोहळ्यात सहभागी झाले होते. विशेष म्हणजे इ.स. २००६मध्ये श्रवणबेळगोळ येथील भगवान बाहुबलीच्या ५८ फूट विशालकाय मूर्तीच्या अभिषेक सोहळ्यातील प्रमुख कार्यवाहक असलेले वीरेंद्र हेगडे हेदेखील महामस्तकाभिषेक सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.