सिन्नरला साकारला महागणपती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 11:48 PM2017-08-24T23:48:32+5:302017-08-25T00:03:27+5:30
येथील हरहुन्नरी कलाकार संजय क्षत्रिय यांच्या हातून ११ हजार छोट्या गणेशमूर्तींपासून महागणपती साकार झाला आहे. दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात अभिनव कलाकृती सादर करण्यात हातखंडा असलेल्या क्षत्रिय यांनी यावर्षी शाडूच्या मातीपासून ११ हजार छोट्या गणपती मूर्ती करून त्यापासून एकच महागणपती साकारल्याने गणेशभक्तांसाठी तो आकर्षणाचा विषय ठरला आहे.
सिन्नर : येथील हरहुन्नरी कलाकार संजय क्षत्रिय यांच्या हातून ११ हजार छोट्या गणेशमूर्तींपासून महागणपती साकार झाला आहे. दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात अभिनव कलाकृती सादर करण्यात हातखंडा असलेल्या क्षत्रिय यांनी यावर्षी शाडूच्या मातीपासून ११ हजार छोट्या गणपती मूर्ती करून त्यापासून एकच महागणपती साकारल्याने गणेशभक्तांसाठी तो आकर्षणाचा विषय ठरला आहे.
संजय क्षत्रिय यांच्या हाताच्या जादूपासून आजपर्यंत अनेक कलाकृती साकारल्या आहेत. गेल्या वीस वर्षांत क्षत्रिय यांनी पाव ते तीन इंचापर्यंत खडू व शाडू मातीपासून सुमारे ३३ हजार गणेशमूर्ती साकारल्या आहेत.
यावर्षी क्षत्रिय कोणती कलाकृती साकारतात याकडे सिन्नरच्या गणेशभक्तांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. गेल्या महिन्यापासून गणेशभक्तांना काय मेजवानी द्यायची याचा विचार क्षत्रिय यांच्या डोक्यात होता. घर लहान असल्याने त्यांनी आत्तापर्यंत बनविलेल्या ३३ हजार छोट्याशा गणेशमूर्ती छोट्या बॉक्समध्ये पॅकिंग करून ठेवल्या होत्या. सुरुवातीला क्षत्रिय यांनी घरातील एक खोली रिकामी करून त्यातील साहित्य अन्य दुसºया खोलीत स्थलांतरित केले. फरशीवर खडूने १८ फूट लांबीचे ‘महागणपती’चे चित्र काढले. या चित्रावर शाडू मातीपासून तयार केलेल्या छोट्या गणेशमूर्ती रंगसंगती साधत ठेवण्यास प्रारंभ केला.
चित्रावर मुकुट, सोंड असे विशिष्ट गणपती लावण्यास प्रारंभ केला. याकामी क्षत्रिय यांचे वडील, पत्नी वंदना, मुलगी पूजा व अक्षदा आणि पुतणे प्रसाद व विशाल यांची मदत झाली. गळ्यातील हार, जानवे, एका हातात मोदक तर दुसरा हात आशीर्वाद देताना दाखविण्यात आला. सर्व गणपतींची ठेवण अतिशय चांगली झाली.
मेहनतीने रेखीव काम आणखीणच शोभून दिसू लागले. लंबोदर म्हणजे मोठे पोट पाहिजे, तेही झाले. पायात तोडेही दाखविण्यात आले. हे सर्व साकार करतांना रंगसंगतीचा बारीक विचार क्षत्रिय यांनी केला.