महानुभाव पंथाचे महंत कारंजेकरबाबा यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 12:26 AM2019-01-20T00:26:56+5:302019-01-20T00:27:17+5:30
महानुभाव पंथातील ज्येष्ठ अभ्यासक व अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे माजी अध्यक्ष कविश्वर कुल आचार्य महंत गोविंदराज कारंजेकरबाबा (७८) यांचे मुंबई येथे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. अमरावती राजापेठ येथील महानुभाव आश्रमाचे ते मुख्य संचालक होते.
नाशिक : महानुभाव पंथातील ज्येष्ठ अभ्यासक व अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे माजी अध्यक्ष कविश्वर कुल आचार्य महंत गोविंदराज कारंजेकरबाबा (७८) यांचे मुंबई येथे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. अमरावती राजापेठ येथील महानुभाव आश्रमाचे ते मुख्य संचालक होते. महानुभाव पंथातील विविध धार्मिक कार्यक्रमांत त्यांचा प्रमुख सहभाग होता.
कारंजेकरबाबा यांनी दहा वर्षे महानुभाव परिषदेचे अध्यक्षपद सांभाळले. या कार्यकाळ त्यांनी महानुभाव पंथाच्या प्रचार, प्रसार आणि प्रबोधन कार्यासाठी महत्त्वाचे कार्य केले. मूळचे नवी दिल्ली येथील रहिवासी असलेल्या कारंजेकरबाबा यांनी बालवयातच पंथीय ब्रह्मविद्या शास्त्राचे धडे गिरविले. कालांतराने अमरावती येथे त्यांना कविश्वर कुळाची कुलाचार्य महंती प्राप्त झाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्टÑात तसेच नवी दिल्ली, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश या राज्यात महानुभव पंथियांची श्रीकृष्ण, श्रीदत्त आणि श्रीचक्रधर स्वामींची शेकडो मंदिरे स्थापन झाली. नाशिक जिल्ह्यातील सुकेणे येथील श्री दत्त मंदिराला त्यांनी अनेक वेळा भेट दिली होती.
नाशिक, नगर, अमरावती, नागपूर, औरंगाबाद आदी ठिकाणी झालेल्या राज्यस्तरीय महानुभव पंथीय कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली होती. राज्यभरात त्यांचा शिष्य परिवार असून, दरवर्षी भानखेडी येथे त्यांच्या प्रवचन सोहळ्याला लाखो सद्भक्त हजेरी लावत असत.
त्यांच्या जाण्याने पंथाची मोठी हानी झाली आहे, अशी शोकसंवेदना अखिल विश्व महानुभाव परिषदेचे अध्यक्ष उपाध्य कुलाचार्य महंत बीडकरबाबा आणि अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे उपाध्यक्ष आचार्य प्रवर महंत सुकेणेकरबाबा यांनी व्यक्त केली.