अंगारकीनिमित्त ठेंगोड्याच्या गणपती मंदिरात महापूजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:14 AM2021-07-28T04:14:48+5:302021-07-28T04:14:48+5:30
लोहोणेर : अंगारकी चतुर्थी म्हणजे श्रीं च्या दर्शनाची भाविकांसाठी पर्वणी असते. अंगारकीला गणेशभक्त पहाटेपासून मंदिरात गर्दी करतात. कोरोनाचा ...
लोहोणेर : अंगारकी चतुर्थी म्हणजे श्रीं च्या दर्शनाची भाविकांसाठी पर्वणी असते. अंगारकीला गणेशभक्त पहाटेपासून मंदिरात गर्दी करतात. कोरोनाचा प्रादुर्भाव असून नवसाला पावणारा म्हणून ख्याती असलेल्या ठेंगोडा येथील स्वयंभू सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी पहाटे चार वाजेपासूनच भाविकांची गर्दी दिसून आली, तर कोरोना नियमांचे पालन करीत तोंडाला मास्क लावत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवीत भाविकांनी दर्शन घेतले. गर्दी न करता बाहेरून ‘श्रीं’चे दर्शन घ्यावे या ट्रस्टच्या आवाहनाला भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला. अंगारकीनिमित्त पहाटे चार वाजता ‘श्रीं’ची महापूजा करण्यात आली. त्यानंतर गाभारा बंद करून ट्रस्टच्या वतीने सर्वांना ‘श्रीं’च्या मुखदर्शनाची भाविकांसाठी व्यवस्था करण्यात आली.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व नवसाला पावणारा गणपती म्हणून येथील स्वयंभू सिद्धिविनायकाची सर्वत्र ख्याती आहे. परराज्यातून, तसेच जिल्ह्यातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. देवळा व सटाणासह शेजारील तालुक्यांतील बहुसंख्य भाविक अनवानी आपापल्या कुटुंबातील सदस्यांसह दर्शनासाठी येतात. यात महिला भाविकांची संख्या लक्षणीय असते. अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने मंदिर परिसरात मोठी यात्रा भरते. मात्र, यावेळी कोरोना महामारीमुळे मंदिर बंद असल्याने साक्री-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर पूजा साहित्य व फराळाची दुकाने थाटण्यात आलेली असल्याने वाहतुकीची मोठी कोंडी होत होती. पहाटे चारपासून रात्री उशिरापर्यंत हजारो गणेश भक्तांनी ‘श्रीं’चे मुख दर्शन घेतले. यावेळी सटाणा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
(२७ लोहोणेर १/२)
270721\27nsk_20_27072021_13.jpg
२७ लोहोणेर १/२