महापुरे येती, तेथे ‘गोदापार्क’ वाहूनी जाती!
By admin | Published: August 4, 2016 01:52 AM2016-08-04T01:52:20+5:302016-08-04T01:53:18+5:30
राजहट्टाचे परिणाम : गोदावरीच्या पूररेषेत असलेला सदर ड्रीम प्रोजेक्ट गुंडाळला जाणार?;
नाशिक : गंगापूररोडवरील आसारामबापू पुलालगत रिलायन्सच्या माध्यमातून सुमारे ६०० मीटरचा साकारण्यात येणाऱ्या ‘गोदापार्क’ प्रकल्पामागील दुष्टचक्र संपण्याची काही चिन्हे दिसेनात. राजहट्टापायी गोदावरीच्या पूररेषेत उभा राहत असलेला गोदापार्क प्रकल्प गोदामाईच्याच रौद्ररूपाने पार उद्ध्वस्त करून टाकला. यापुढेही वारंवार पुराच्या पाण्याची झळ पोहोचणार असल्याने राज यांचा ड्रीम प्रोजेक्ट गुंडाळला जाणार काय, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.
गेल्या १२ ते १३ वर्षांपासून नाशिककरांना राज ठाकरे यांनी ‘गोदापार्क’चे स्वप्न दाखविले आहे. अगोदर रामवाडी पूल ते इंद्रप्रस्थ पुलापर्यंत तयार केलेल्या गोदापार्कचे रूपांतर ‘जॉगिंग ट्रॅक’मध्ये झाल्यानंतर आसारामबापू पुलालगत रिलायन्स उद्योग समूहाच्या माध्यमातून ६०० मीटरचा गोदापार्क साकारण्यास प्रारंभ करण्यात आला. गोदावरीच्या पूररेषेत सदर प्रकल्प अजिबात तग धरणार नाही, अशी टीका वारंवार विरोधकांनी करूनही राजहट्ट कायम राहिला आणि महापालिकेत मनसेची सत्ता आल्यानंतर ‘गोदापार्क’ने पुन्हा एकदा उचल खाल्ली. रिलायन्स फाउण्डेशनने पर्यटन स्थळ म्हणून गोदापार्क आकर्षित व्हावा यासाठी प्रयत्न केले. आसारामबापू पुलालगत असलेल्या गोदाकाठावर हिरवळ लावून नाशिककरांचे लक्ष वेधले.
या वर्षाच्या सुरुवातीलाच गोदापार्क प्रकल्पाचे उद्घाटन करण्याचा मनसुबा मनसेने आखला होता परंतु कोरड्या पडलेल्या पात्रामुळे गोदापार्कचे सौंदर्य हरवल्याने ‘गोदेला पाणी तर येऊ द्या’ अशी भूमिका मनसे नेत्यांकडून घेतली गेली आणि उद्घाटनाला विलंब होत गेला. मागील महिन्यात गोदापार्कच्या उद्घाटनाची घटिका समीप आल्याचा सांगावा ‘कृष्णकुंज’वरून आला परंतु १० आणि ११ जुलैला झालेल्या पावसामुळे या मोसमातील पहिला पूर गोदावरीला आला. या पुरामध्येच ‘गोदापार्क’चे नुकसान झाले. गोदापार्क प्रकल्प अद्याप रिलायन्सने महापालिकेकडे हस्तांतरित केलेला नसल्याने तेच प्रकल्पाची दुरुस्ती करतील, असा पवित्रा घेतला.
रिलायन्समार्फत पुन्हा दुरुस्तीला वेग आला असतानाच मंगळवारच्या महापुराने तर गोदापार्कची अक्षरश: वाट लागली. ठिकठिकाणी फरशा उखडून पडल्या आहेत. दीपस्तंभ कोलमडून पडले आहेत. हिरवळ नष्ट झाली आहे. नारळाची झाडे कलली आहेत. पुन्हा गोदापार्क उभा करण्यास बराच कालावधी जाणार आहे आणि तोपर्यंत नाशिक महापालिकेत सत्तांतर झाले तर ‘गोदापार्क’चे भवितव्य अंधांतरीच राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)