महाराणा प्रताप जयंती मिरवणूक : चित्ररथांनी वेधले लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 12:28 AM2018-06-17T00:28:40+5:302018-06-17T00:28:40+5:30
ढोल-ताशांच्या गजरात आणि मर्दानी तसेच साहसी खेळ सादर करीत महाराणा प्रताप जयंती मिरवणूक उत्साहात संपन्न झाली. महाराणा प्रताप यांच्या जयजयकाराने यावेळी परिसर दुमदुमला होता.
नाशिक : ढोल-ताशांच्या गजरात आणि मर्दानी तसेच साहसी खेळ सादर करीत महाराणा प्रताप जयंती मिरवणूक उत्साहात संपन्न झाली. महाराणा प्रताप यांच्या जयजयकाराने यावेळी परिसर दुमदुमला होता. अखिल महाराष्ट्र कातरी शिकलकर समाज, उत्सव समिती तसेच महाराणा प्रताप सेवा संस्थेच्या वतीने शनिवारी (दि. १६) ही मिरवणूक काढण्यात आली. बी. डी. भालेकर मैदान येथे आमदार बाळासाहेब सानप, भाजपा सरचिटणीस लक्ष्मण सावजी, शिवसेनेचे महानगरप्रमुख सचिन मराठे तसेच पोलीस निरीक्षक मंगलसिंग राजपूत यांच्या हस्ते तसेच रामसिंग बावरी यांच्या उपस्थितीत या मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मिरवणुकीत सहभागी समाज बांधवांनी ‘महाराणा प्रताप महाराज की जय’ असा जयघोष केला, तसेच फटाक्यांची आतषबाजी केली. मिरवणुकीत सहभागी पाच चित्ररथांचा समावेश करण्यात आला. काही जिवंत देखावेदेखील सहभागी होते. ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीत दांडपट्टे, चक्र असे अनेक खेळ सादर करण्यात आले. बी. डी. भालेकर मैदानापासून सुरू झालेली मिरवणूक शालिमार, अशोकस्तंभ मार्गे पंचवटी कारंजा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. यावेळी विविध सामाजिक संस्थांकडून स्वागत करण्यात आले. यावेळी मिलिंद राजपूत, काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष वसंत ठाकूर, बबलूसिंग परदेशी, करण बावरी, सुरेश पवार, गणेश ठोक, कृष्णा भोंड, विकी राठोड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.