सकाळच्या दोन तासांत नाशिक शहरात सरासरी ६ टक्के मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 11:32 AM2024-11-20T11:32:30+5:302024-11-20T11:32:51+5:30
नाशिक शहरामध्ये सकाळी ७ पासून मतदान केंद्रांवर मतदानासाठी सुरुवात झाली. मात्र, प्रारंभीच्या दोन तासांच्या टप्प्यात मतदानाचा वेग कमी होता.
नाशिक - नाशिक शहरामध्ये सकाळी ७ पासून मतदान केंद्रांवर मतदानासाठी सुरुवात झाली. मात्र, प्रारंभीच्या दोन तासांच्या टप्प्यात मतदानाचा वेग कमी होता. शहरातील ४ मतदारसंघांमध्ये सकाळी सरासरी ६ टक्के मतदान झाले. त्यातही सकाळी नाशिक मध्य मतदारसंघात थोड्या अधिक प्रमाणात मतदानाचा वेग वाढला होता. त्यामुळे सकाळी ९ वाजेपर्यंत नाशिक मध्य मतदारसंघात ७.५५ टक्के, नाशिक पूर्व मतदारसंघात ६.४३ टक्के, नाशिक पश्चिममध्ये ६.२५ टक्के तर देवळाली मतदारसंघात ४.४२ टक्के इतकेच मतदान झाले होते.
यंदा चारही मतदारसंघांमध्ये उमेदवारांच्या मतदान प्रतिनिधींचे बूथ तुलनेने कमी होते. तर काही ठिकाणी उमेदवारांचे प्रतिनिधीच सकाळच्या टप्प्यात पोहोचले नसल्याने बूथ रिकामे होते. त्यामुळे ज्या मतदारांनी आधी स्लीप घेतल्या नव्हत्या, त्यांना बूथ क्रमांक आणि मतदारक्रमांक मिळणेदेखील मुश्कील झाले होते. त्यात सकाळी थंडी वाढलेली असल्याने ज्येष्ठांचे मतदानाला बाहेर पडण्याचे प्रमाण नेहमीच्या तुलनेत अत्यल्प दिसून आले.त्यामुळे सकाळच्या दुसऱ्या टप्प्यापासून मतदानाचा वेग वाढण्याची शक्यता आहे.
काही जॉगिंग ट्रॅकजवळच्या मतदान केंद्रांवर नागरिक जॉगिंग करुन ट्रॅक सूट किंवा टी शर्ट बर्मुडा घालूनच थेट मतदानाला आल्याचेही दिसून आले. काही केंद्रांवर पती, पत्नीची नावे एकाच केंद्रावर मात्र वेगवेगळ्या खोलीत तर काही ठिकाणी एकाच कुटुंबातील काही सदस्यांचे मतदान भिन्न केंद्रांवर असे प्रकारदेखील आढळून आले.
होमगार्ड झाले मोबाइलगार्ड
मतदान केंद्रांवर मोबाईलला परवानगी नसल्याने अनेक नागरिकांना मतदान केंद्रात जाण्यापूर्वी खिशातील मोबाईल बाहेरच ठेवण्यास सांगितले जात होते. त्या परिस्थितीत बहुतांश केंद्रांवर पोलीसदादा किंवा होमगार्डच्या सुरक्षारक्षकांकडे मोबाईल सोपवून नागरिक मतदानाला आत जात असल्याचेही चित्र दिसून आले.