Devayani Farande : फरांदे समर्थकांचे फडणवीसांना साकडे; माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचे मुंबईत शक्तिप्रदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 11:46 AM2024-10-22T11:46:09+5:302024-10-22T11:47:52+5:30
Maharashtra Assembly Election 2024 Devayani Farande : मध्य नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे यांना का उमेदवारी दिली नाही, असा प्रश्न करीत मध्य नाशिकमधील माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उमेदवारीसाठी साकडे घातले.
नाशिक: भाजपने शहरातील दोन आमदारांना पुन्हा उमेदवारी दिली असताना केवळ मध्य नाशिकमध्येच आमदार देवयानी फरांदे यांना का उमेदवारी दिली नाही, असा प्रश्न करीत मध्य नाशिकमधील माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उमेदवारीसाठी साकडे घातले. त्यावर फडणवीस यांनी नक्कीच विचार केला जाईल, असे आश्वासन दिले.
नाशिक शहरात भाजपाचे तीन आमदार असून रविवारी घोषित पहिल्या यादीत नाशिक जिल्ह्यातील पाचपैकी चार आमदारांना संधी मिळाली आहे. मात्र, नाशिकमध्ये निवडून आलेल्या आमदार देवयानी फरांदे यांचे नाव पहिल्या यादीत न आल्याने त्यांच्यासह समर्थकांना धक्का बसला आहे. यासंदर्भात सोमवारी आमदार देवयानी फरांदे यांच्यासह मध्य नाशिक मतदारसंधातील माजी नगरसेवक, मंडल अध्यक्ष तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनी मुंबई गाठली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची या सर्वांनी दुपारी भेट घेतली.
सुमारे २१ माजी नगरसेवक यावेळी उपस्थित होते. भाजपाने शहरातील दोन आमदारांची नावे घोषित करण्यात आली; परंतु आमदार फरांदे यांचे नाव पहिल्या यादीत आले नाही. मुळात फरांदे यांनी मतदारसंघात कामे केली असून, त्यांचे नाव का टाळण्यात आले हे समजू शकले नाही, अशी कैफियत यावेळी कार्यकर्त्यांनी मांडली.
आता पर्यायी उमेदवार शक्य कसा...?
पश्चिम नाशिक मतदारसंघात दहा ते बारा इच्छुका होते. मध्य नाशिकमध्ये तशी परिस्थती नाही, त्यातच आता निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होत असताना पर्यायी उमेदवार दिल्यास त्याला एकूणच निवडणूक लढविण्यासाठी कितपत वेळ मिळेल, अशी शंका यावेळी उपस्थित करण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदारसंघाचा विचार सुरू असून, फरांदे यांच्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असेही स्पष्ट केले. यावेळी माजी महापौर सतिश कुलकर्णी, दिपाली सोनवणे, अॅड. शाम बडोदे, स्वाती भामरे, अनिल भालेराव यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.